चंद्रपूर;-चंद्रपूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी आलेले एमबीबीएसचे तीन विद्यार्थी पाण्यात बुडाले आहेत.यात गोपाळ गणेश साखरे(रा.चिखली,जि.बुलढाणा),पार्थ बाळासाहेब जाधव(शिर्डी,जि.अहिल्यानगर) व स्वप्नील उध्दवसिंग शिरे(जि.छत्रपतीसंंभाजीनगर)यांचा समावेश आहे. या घटनेबद्दल कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. हे विद्यार्थी गडचिरोली येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते. पोहण्यासाठी आलेल्या या तिघांवर काळाने घाला घातला असल्याचे बोल उमटत आहेत.
मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गडचिरोली येथील ८ एमबीबीएसचे विद्यार्थी गेले होते,त्यापैकी ३ विद्यार्थीना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचलेले असून पाण्यात बुडालेल्या तिघांचा शोध हा घेतला जातोय. आज शनिवारची सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी आले होते.
मात्र, यादरम्यान तिघेजण पाण्यात अचानक बुडाले. दरम्यान पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यास यश मिळाले. मात्र, तिघेजण बुडाले. अनेक प्रयत्न करूनही तिघेही शोधकार्यदरम्यान सापडले नाही. शेवटी रात्र झाल्याने ही शोधमोहिम प्रशासनाकडून थांबवण्यात आली.आज परत शोधमोहिम ही सुरू केली गेली आहे. या घटनेने तिघांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.