37.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 14

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करा-आमदार अग्रवाल

0

गोंदिया,दि.०५ः-गोंदिया तालुक्यात गेल्या तीन चार दिवसात झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांचे, शेतांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागातील शेत व घऱांची पाहणी करीत स्वतः गावागावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पीडित नागरिकांशी थेट संवाद साधला.त्यांनतर तालुका प्रशासकीय यंंत्रणेला या नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी आमदारांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना त्वरित संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या दौऱ्यात आमदार अग्रवाल यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानवडे, तहसीलदार गोंदिया ग्रामीण समशेर पठाण, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपताई चंद्रिकापुरे, तालुका कृषी अधिकारी नेहा आढाव तसेच संबंधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची-जि.प.उपाध्यक्ष हर्षे

0

गोंदिया,दि.०५ः जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्या पुढाकारातून प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षातील पुर्वतयारी नियोजनाला घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे केद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सहविचार सभेचे तचेस शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण २९ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन येथील पोवार बोर्डींग सभागृहात नुकतेच पार पडले.या सहविचार सभेला मुख्याध्यापक,अधिकारी व पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती नोंदवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते.मार्गदर्शक म्हणून जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश यशवंतराव हर्षे, बांधकाम व अर्थ सभापती डॉ.लक्ष्मण भगत,कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपाताई चंद्रीकापुरे,महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे उपस्थित होते.यावेळी जि.प.सदस्य सौ.सविता पुराम,सौ.पूजाताई सेठ,सौ.रचनाताई गहाणे.सौ.तुमेश्वरी बघेले,सौ.अश्विनीताई पटले,जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर,शसेंद्र भगत,वंदना काळे,निशा तोडासे,अंजलीताई अटरे,सौ.छायाताई नागपुरे,छबूताई उके,आनंदाताई वाडीवा,वैशालीताई पंधरे, सौ नेहा तुरकर,सुधाताई रहांगडाले,जयश्रीताई देशमुख,लक्ष्मी तरोणे,विमलताई कटरे,रीतेशकुमार मलगाम, माध्य. शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये,उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे,विस्तार अधिकारी डी.बी दिघोरे,एम.जी.डहाके,शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,नवोदय शाळेचे शिक्षक ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी केले.शासन स्तरावरून शासकीय जिल्हा परिषद शाळेला वेळोवेळी होत असलेले मार्गदर्शन, नवीन उपक्रम प्रशिक्षण व तंत्रज्ञान,जिल्हा परिषद शाळेला उपलब्ध होत असलेले सर्व प्रशिक्षण सेवा याबाबत माहिती दिली.
शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी सहविचार सभेला मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरीता गावस्तरावार चांगली सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून सीबीएससी पॅटर्न सन २०२५ ला लागू केला आहे.त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण क्षेत्रातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता जिल्हा निधी व 15 वित्त आयोग अंतर्गत अंदाजे येणाऱ्या काळामध्ये 300 स्वयंसेवक,मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 165 शिक्षक व पवित्र पोर्टल टप्पा- २,२०२५-२६ ला १६८ शिक्षक भरती प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेने वेळीच स्वयंसेवक व घड्याळ तासिका शिक्षकांचे मानधन कसे करता येईल याकरिता जिल्हा निधी अंतर्गत ५० लक्ष रू.घड्याळी तासिका शिक्षक व ९० लक्ष रू.स्वयंसेवक मानधनाकरिता तरतूद २०२५-२६ या आर्थिक वर्षाला करून ठेवल्याचे सांगितले .जिल्हा परिषदेला ३१ ऑगस्टच्या बिंदूंनामावलीप्रमाणे ६२९ शिक्षकाची उणीव असून वरील प्रमाणे नमूद शिक्षकाची भरपाई भरुन काढणार व ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त हर्षे यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे शिक्षक हा देशाच्या भविष्य घडवणारा व आम्हा सर्वंचा गुरु आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शिक्षकांनी गुरुवरची भूमिका अदा करत सामान्य जनतेचे विश्वास जिंकावे.गावातील पालकाच्या भेटीगाठी पालकाची सहविचार व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची माहिती पालकापर्यंत कशी पोहोचता येईल व पालकांना विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता व कमतरता कळवावे.प्रत्येक महिन्याला घटक चाचणीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला चाचणी घ्यावी जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे .जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उत्तीर्णच्या प्रमाण बघितलं किंवा गुणवत्ता बघितली तर जिल्हा परिषद शाळा कुठेही मागे नाही फक्त प्रचार प्रसार व आत्मविश्वास वाढवून काम करण्याची शिक्षक व शिक्षण विभागाला आवश्यकता असल्याबाबत मत व्यक्त केले.त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये स्वयं अर्थसहाय्य ग्रामपंचायत शाळा समिती व शिक्षकांनी सहकार्यांनी कॉनवेंट सुरू व्हावी जेणेकरून बालपणापासून त्याला इंग्रजी विषयी यायला पाहिजे जेणेकरून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून त्याला सहजतेने गुणवत्ता प्राप्त करता येईल त्याचप्रमाणे आता ग्रामीण क्षेत्रांमध्ये पण शासनाच्या धोरणामुळे प्रत्येक गावाला सीबीएससी अभ्यासक्रम सुरू होत असलेल्या बाबत शिक्षकांनी,मुख्याध्यापकांनी पालकांना सांगावं व ज्या शासन स्तर किंवा जिल्हा परिषद स्तर असलेल्या शिक्षकांचे प्रश्न वेळी कसे मार्गी लावता येतील याकरिता प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्यांनी आपण संघटनांशी बोलून प्रश्न मार्गी लावू व जिल्हा परिषद स्तर राज्यस्तर टप्प्याटप्प्याने कसा सोडवता येईल हा प्रयत्न करू याप्रमाणे शिक्षकांना आव्हान केले.आपल्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कशी वाढेल व गुणवत्तापूर्वक शिक्षण कसं मिळेल याकरिता जिल्हा परिषदेपासून राबवत असलेल्या योजनेबाबत पाठपुरावा सादर करत संपूर्ण जिल्हा परिषदेची माहिती आढावा सभेला सहविचार सभेला सादर केली.

‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा!

0

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.
छ. संभाजीनगर, ५ (प्रतिनिधी) – शब्दवेध बुक हाऊस प्रकाशन संस्थेच्या वतीने जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेशजी पुरी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त, ‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्काराचे मानकरी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, अंबाजोगाई यांची निवड करण्यात आली आहे.
संवेदनशील पालक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, लोकोपयोगी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी सर हे संबंध देशभरात परिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. तेच विद्यार्थी आणि लाभार्थी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून शब्दवेध बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या वतीने या वर्षापासून सदर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे दैनिक मराठवाडाच्या लातुर आवृत्तीचे संपादक होते. ते शेतकरी संघटनेतील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी शेतकरी आत्महत्या संदर्भात लेखनासह कृतीशील उपक्रमही राबवले आहेत. त्यांनी सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.त्यात ‘नाते, कलमा, संवाद, आकलन, शेतकरी विरोधी कायदे’सह दहा पुस्तके त्यांची प्रकाशित झाले आहेत. ‘शेतकरी विरोधी कायदे’ या ग्रंथाचा वेगवेगळ्या भाषेत अनुवादही झाला आहे. ते सध्या आंतरभारती मासिकाचे संपादक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमर हबीब यांची निवड केल्याचे प्रकाशक वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले.
जनसंपर्क विषय विद्यापीठात शिकविताना प्रा. पुरी सरांनी लोकसंपर्कच अधिक ठेवला. ते कधीच रूबाबदार प्राध्यापक न होता, जबाबदार पालक झाले. त्यामुळे त्यांचे शेकडो विद्यार्थी देशाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असले तरी प्रा. पुरी यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञशील आहेत. प्रा. पुरी यांचे ‘जनसंपर्क : संकल्पना आणि सिद्धांत’ हा ग्रंथ खूप लोकप्रिय ठरला. तो विद्यापीठीय विद्यार्थ्यांसह सार्वजनिक जीवनात काम करणार्‍यांसाठी अत्यंत उपयोगी म्हणूनच त्या ग्रंथाकडे पाहिले जाते. हाच ग्रंथ हिंदीतही प्रकाशित झाला असून ‘महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी’चा बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कारही या ग्रंथाला मिळाला आहे. सन २०१० साली प्रा. पुरी यांच्यावर ज्येष्ठ पत्रकार महारूद्र मंगनाळे यांनी ‘आई मनाचा माणूस’ हा ग्रंथ संपादित केला असून लातुरच्या मुक्तरंग प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत.
अकरा हजार रुपये रोख रक्कम, मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर कार्यक्रम दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनु हिल येथे संपन्न होणार आहे. पुरस्काराचे पहिलंच वर्ष असून यापुढेही लोकपत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा सन्मान करताना या पुरस्काराचे मूल्य जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वाघमारे यांनी सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेला प्रभाकर अर्सूड, डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते.

कु.कृतिका देवानंद खुळसिंगे विद्यालयातून प्रथम, विद्यालयाच्या वतीने सत्कार

0

*येरंडी येथील दहिवले आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश*

*अर्जुनी मोरगाव :*आज दि.५ मे ला जाहीर झालेल्या एच.एस.सी बारावी परीक्षेचा निकालात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील येरंडी/देवलगांव येथील श्रीमती मालीनीताई एस. दहीवले आदिवासी आश्रमशाळेतील कु. कृतिका देवानंद खुळसिंगे या विद्यार्थीनींने प्रतिकुल परीस्थितीवर मात करीत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या विद्यार्थीनींने ५३.१७ टक्के गुण घेतले आहे. विद्यालयाचा निकाल ९७.२२ टक्के लागला असुन यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, विद्यालयातील अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा व अतिरीक्त अध्यापन या यशस्वी सेवेच्या कार्याला दिले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था सचिव दलीत मित्र सुखदेवराव दहीवले, अध्यक्ष मालीनीताई दहीवले, उपाध्यक्ष रत्नदिप दहीवले, सहसचिव अनिल दहीवले, प्राचार्य त्रिवेणी रत्नदीप दहीवले, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, संचालक प्रा.नुतन अनिल दहीवले व वर्गशिक्षक चन्द्रवनसी, रहांगडाले, येळे, गजभिये, चवरे सर व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले आणि विशेष म्हणजे शाळेतुन प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. कृतिका देवानंद खुळसिंगे या विद्यार्थीनींला वन्यजीव मार्गदर्शक तथा सामाजिक कार्येकर्ते प्रभाकर दहिकर यांनी त्यांची आर्थिक परीस्थिती लक्षात घेता वेळोवेळी शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करून त्या विद्यार्थीनींला पुढील वाटचालीस प्रेरीत करून शिकण्यास बळ देण्याचं काम करत आले असून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने मदतीचा हात पुढे करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम हे अनेक वर्षांपासून करीत आहेत आणि त्यामुळे या माध्यमातून प्रभाकर दहिकर यांच कौतुक करून सामाजिक कार्येकर्ते म्हणून अनेक कार्यक्रम व इतर ठिकाणी सत्कार, अभिनंदन सुद्धा अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी व परिसरातील नागरीक करीत असतात.

पुराडा आश्रम शाळेतील श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम तालुक्यातून प्रथम

0

देवरी–आज नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी च्या निकालात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथील श्रृती लक्ष्मीशंकर मरकाम हिने देवरी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, श्रृती लक्ष्मीशंकर मरकाम हिने ८३.३३ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला, श्रृती दहावी च्या परीक्षेत सुद्धा देवरी तालुक्यातून प्रथम आलेली होती हे विशेष, श्रृतीने आपल्या यशाचे श्रेय वडील लक्ष्मीशंकर मरकाम सरपंच पुराडा व आई सुनिता मरकाम जिल्हा परिषद शिक्षिका तसेच शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांना दिले असून अथक परिश्रम केल्याने यश नक्कीच मिळते असे सांगितले असून काल झालेल्या निट परीक्षेत (वैद्यकीय प्रवेश चाचणी पुर्व परीक्षा) सुद्धा नक्कीच पास होऊन एमबीबीएस ला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल असे सांगितले, एमबीबीएस डॉक्टर बनने हे माझे स्वप्न असल्याचे यावेळी श्रृती ने सांगितले, तिच्या या यशाबद्दल देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद सदस्या सविताताई पुराम,प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सायली चिखलीकर, शिरीष सोनेवाने, सुनिल भुसारी,कपील शर्मा,एस के बन्सोड तसेच शासकीय आश्रमशाळा पुराडा येथील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

‘रंग बावरी’ ठरले महावितरणच्या नाट्यस्पर्धेचे ‘सर्वोत्कृष्ट’; ‘सिकॅरिअस’ने पटकावले उपविजेतेपद

0

चंद्रपूरदि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले.

या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले.

नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला.

चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल:

  • सर्वोत्तम नाटक:
    • प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल)
    • द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल)
  • दिग्दर्शन:
    • प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’)
  • अभिनय (पुरुष):
    • प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’)
    • द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’)
  • अभिनय (स्त्री):
    • प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’)
    • द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’)
  • नेपथ्य:
    • प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’)
  • प्रकाश योजना:
    • प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’)
  • पार्श्वसंगीत:
    • प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’)
    • द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’)
  • रंगभूषा-वेशभूषा:
    • प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’)
    • द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’)
  • उत्तेजनार्थ पारितोषिक:
    • सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’)
    • अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’)
    • नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’)
    • संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते जलरथाचे उद्घाटन

0

गोंदिया, दि.5 : शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसार व जनजागृती करण्यासाठी गोंदिया जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जैन संघटन व सहयोगी सुहाना स्पाईसेस यांच्याद्वारे गोंदिया जिल्ह्यामध्ये जनजागृती करणाऱ्या जलरथाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम व निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

       यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सत्यजीत राऊत, सहायक अधीक्षक संजय धार्मिक, सहायक महसूल अधिकारी सर्वश्री पी.झेड.बिसेन, अमोल गजभिये, नोकलाल कटरे, माधुरी मेश्राम, सोनाली भोयर, हरिश्चंद्र पौनीकर (डीपीएम), योगेश वैकुंठी (नरेगा), बिजेएस पदाधिकारी गोरेगाव सौरभ जैन, बिजेएस जिल्हा समन्वयक रोशन गायधने उपस्थित होते.

       जलरथाद्वारे गावा-गावामध्ये जाऊन तलावाचे पुनरुज्जीवन करण्याकरीता माहिती देवून मागणी अर्ज करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे शिवार पोर्टल व बिजेएस ॲपची माहिती देऊन मागणी अर्ज करण्याबाबत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोफत गाळाचे महत्व, तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे फायदे, शेत शिवारामध्ये माती टाकल्याने होणारे फायदे इत्यादी माहिती जलरथाद्वारे पुरविली जाणार आहे.

       तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी महाराष्ट्र राज्यात एकच दर निश्चित करण्यात आलेला आहे. पात्र स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायत या कामासाठी अर्ज करुन जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पध्दतीनुसार काम करता येईल. तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटूंब शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चित दराने अनुदान दिले जाणार आहे.

भेसळीच्या संशयावरुन ‘टोस्ट’ हमसफर ब्रॉण्डचा साठा जप्त

0

 गोंदिया, दि.5 : अन्न व औषध प्रशासन गोंदिया कार्यालयास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि.3 मे 2025 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी पी.व्ही.मानवतकर यांनी गोंदिया शहरातील मेसर्स माँ शक्ती एजन्सीज, घमंडी बिअरबार जवळ, भैरव बाबा मंदिर समोर, बावली, गोंदिया या ठिकाणी छापा टाकून भेसळीच्या संशयावरुन बालाघाट येथून आलेला ‘टोस्ट’ हमसफर ब्रॉण्डचा नमूना घेवून उर्वरित साठा 88 किलो, किंमत 3520 रुपये जप्त केला. सदरचे टोस्ट हे 6 किलोच्या कारटुन बॉक्समध्ये विक्रीस असल्याचे निदर्शनास आले. टोस्ट या अन्नपदार्थाच्या बॉक्सवर उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी विक्रेता अशोककुमार रहानदोमल ज्ञानचंदानी यांच्याकडून नमूना घेण्यात आलेला आहे व पुढील कार्यवाही सुरु आहे.

        अन्नपदार्थ खरेदी करतांना त्याच्या वेष्टनावर (बॅग/बॉक्सवर) उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, सदर अन्नपदार्थाचा सर्वोत्तम कालावधी, FSSAI परवाना क्रमांक नमुद असलेले अन्नपदार्थच खरेदी करावेत. अन्नपदार्थ ज्या नावाने खरेदी केले आहे त्याचे खरेदी बील स्वत:कडे ठेवावे, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी केले आहे.

महावितरण अभियंत्याला मारहाण करणा-याला न्यायालयाचा दंड

0

नागपूर, दि. 5 मे 2025: – महावितरणच्या अभियंत्याला शिवीगाळ करणाऱ्याला तसेच त्याच्या कानशिलात लगावणाऱ्याला सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. तालेकर यांनी एकूण साडे दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असुन दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे

शेख छोटेसाहेब शेख नवाब (वय 40), रा. बाबा फरीदनगर, खरबी) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महावितरणचे सहाय्यक अभियंते हरीश मुंगसे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा आरोप आहे. ही घटना 28 एप्रिल 2023 रोजी वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुंगसे हे त्यावेळी खरबी परिसरातील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. आरोपी छोटेसाहेब तेथे आला. त्याला महावितरणकडून वीजेचे मीटर बदलविण्यासाठी फोन आला होता, असे त्याचे म्हणणे होते. यावरून तो कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. मुंगसे त्याला समजावू लागले, यावर छोटेसाहेबने त्यांना शिवीगाळ करीत  मारहाण केली.

याप्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात सदर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 186, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शेख छोटेसाहेब शेख नवाब याचेवर कलम 353,332 आणि 186 अन्वये दोषी ठरवित कलम 353 अन्वये सार्वजनिक सेवकांना त्यांच्या कर्तव्य बजावताना हल्ला किंवा जबरदस्ती करणे किंवा त्यांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा जबरदस्ती करण्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद याशिवाय कलम 352 अन्वये पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची साधी कैद आणि कलम 186 अंतर्गत पाचशे रुपये दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास त्याला एक आठवड्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावित त्याला दिलेला जामीन देखील रद्द केला आहे.

यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के,कोकण विभागाची बाजी

0

जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

:-बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात बारावीच्या परीक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली आहे हे जाहीर करण्यात आले आहे.यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली होती.

नऊ विभागीय मंडळाचा निकाल

पुणे ९१.३२

नागपूर ९०.५२

छत्रपती संभाजीनगर ९२.२४

मुंबई ९२.९३

कोल्हापूर ९३.६४

अमरावती ९१.४३

नाशिक ९१.३१

लातूर ८९.४६

कोकण ९६.७४

कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षेच बाजी मारत आहे. यावर्षीही कोकणाने ही परंपरा कायम ठेवली आहे. तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.मुलांपेक्षाही मुलींचा निकाल जास्त चांगला लागला आहे.

कोणत्या शाखेची किती टक्केवारी?

विज्ञान- ९७.३५

कला- ८०.५२

वाणिज्य- ९२.६८

व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३

आयटीआय- ८२.०३

बारावीची परीक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्यात पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवू शकतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.