31.9 C
Gondiā
Friday, January 24, 2025
Home Blog

जवाहरनगर आयुध निर्माणीत स्फोट;मोठी जीवितहानी?

0

भंडारा : स्फोट आयुध निर्माणी जवाहरनगर च्या एलपीटीई २३ नंबरच्या इमारतीत आज २४ जानेवारी शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान जोरदार स्फोट झाला. त्यात मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिला नाही.जवाहर नगर परिसरातील जवळपासच्या डझनभर गावांना याचा फटका बसला आहे. या ठिकाणी आर डी एक्स चे निर्माण होते. सध्या कंपनीचे मुख्यद्वर सील करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी गेट जवळ एकच गर्दी केली असून रात्रपाळीत कंपनीत कामाला गेलेले कुटुंबातील नातलग सुखरूप आहेत की नाही याबाबत विचारणा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरवात केली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष येथे प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी अंदाजे दहा वाजता आयुध निर्माणी जवाहर नगर येथे एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावर अग्निशमन पथक पोलीस विभाग तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. सदरचे अनुषंगाने अधिकची मदत म्हणून एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे सुरेश हर्षे होणार विराजमान

0
गोंदिया,दि.२४ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षाकरीता आज २४ जानेवारीला  होत असलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे विराजमान होणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत सुरेश हर्षे यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची निवड पक्की झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात झालेल्या बैठकीत सुरेश हर्षे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपाध्यक्ष पदाचा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने स्पर्धेतील सर्वांना धक्का दिला आहे.

जि.प.अध्यक्षपदी विराजमान होणार भाजपचे लायकराम भेंडारकर !

0

गोंदिया दि.२४:जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता आज २४ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात निवडणूक घेण्यात येत आहे.या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून अध्यक्ष पदाकरीता जि.प.चे गटनेते लायकराम भेंडारकर यांची निवड पक्षाने केली आहे.

चोरखमारा येथे झालेल्या बैटकित भाजपचे पर्यवेक्षक आमदार गिरीश व्यास,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डाॅ.परिणय़ फुके, भाजपचे आमदार विजय रहागंडाले,आमदार विनोद अग्रवाल,आमदार संजय पुराम,भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ.येशुलाल उपराडे,संघटनमंत्री बाळा अंजनकर व भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरीता भाजपचे जि.प.गटनेते लायकराम भेंडारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

जि.प.अध्यक्ष निवडीकरीता चोरखमारा येथे सुरु झाली भाजपची बैठक

0

गोंदिया,दि.२४ ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता आज २४ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात निवडणूक घेण्यात येत आहे.या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून अध्यक्ष पदाकरीता कुणाच्या नावाची चिट्टी निघते याकडे लक्ष लागले आहे.भाजपचे पर्यवेक्षक आमदार गिरीश व्यास,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डाॅ.परिणय़ फुके, भाजपचे आमदार विजय रहागंडाले,आमदार विनोद अग्रवाल,आमदार संजय पुराम,भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ.येशुलाल उपराडे,संघटनमंत्री बाळा अंजनकर व भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत अध्यक्षाच्या नावाला घेत चोरखमारा येथे चर्चा सुरु झाली आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरीता भाजपचे जि.प.गटनेते लायकराम भेंडारकर,डव्वा गटाचे सदस्य डाॅ.भुमेश्वर पटले,मुंडीपार गटाचे सदस्य डाॅ.लक्ष्मण भगत,सेजगाव गटाचे सदस्य पवन पटले  यापैकी कुणाच्या गळ्यात भाजप अध्यक्षपदाची माळ घालते याकडे लक्ष लागले आहे.

आज शुक्रवारी (ता. २४) जिल्हा परिषदेला नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. ५३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे २६ सदस्य, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) आठ, काॅंग्रेसचे १३, चावी संघटनेचे चार, अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची महायुती आहे. भाजपचे २६ आणि अपक्ष दोन मिळून २८ सदस्य असल्याने भाजप स्पष्ट बहुमतात आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे राहील, हे निश्चित आहे.

वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही;उद्धव ठाकरे यांचे आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचे संकेत

0

कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार;

मुंबई:-आगामी मुंबई महापालिका आणि होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेना उबाठा स्वबळावर लढेल याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या मुंबईसह अन्य महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. त्यांच्या बरोबर बैठकाही झाल्या आहेत. त्या सर्वांचं मत आहे एकटं लढलं पाहीजे. आपली ताकद ही आहे. अजून निवडणूका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे तुमची जिद्द पाहाणार आहे. तयारी पाहाणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्याच जाहीर सभेत बोलत होते. यावेळी ते भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत भाजपवर देखील हल्ला चढवला. अगदी शामा प्रसाद मुखर्जींपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत भाजपच्या नेत्यांनी काय काय केलं होतं हेच जाहीर पणे सांगितलं. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुकींबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर त्यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आपण जो निर्णय घेवू तो कार्यकर्त्यांच्या मना प्रमाणे घेवू असंही ते म्हणाले. अनेकांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले आहे. त्यातून तुमची तयारी आणि जिद्द पाहून निर्णय घेवू. पण यावेळी मला सूड उगवून पाहीजे. असे ते म्हणाले.

जो आपल्या पाठीत वार करतो. आपल्या कुशीत वार करतो अशा गद्दारांना आणि गद्दारांवर वरदहस्त असणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा नको. त्यांना त्यांची जागा आगामी निवडणुकीत दाखवून द्या. विधानसभेला जो पराभव झाला तो आपल्याला पटलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही तो पटला नाही. लोकसभेला जो मोदी शहांना महाराष्ट्राने दणका दिला त्याचा धसका त्यांनी घेतला. महाराष्ट्र हातून गेला तर दिल्लीही हातून जाईल हे त्यांना माहित होते. त्यातूनच असा निकाल लावला गेला. अनेकांनाही हा विजय अजून पचनी पडलेला नाही. ते ही त्या धक्क्यात आहेत असंही ते म्हणाले. जर दम असेल तर ईव्हीएम सोडून बॅलेटवर मतदान घ्या असं आव्हानही ठाकरे यांनी यावेळी दिलं.

उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली असं अमित शहा म्हणाले होते. त्याचा चांगलाच समाचार या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी घेतला. तुम्ही मराठी माणसाच्या नादी लागू नका. जखमी वाघ काय असतो त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला नक्की दिसेल. उद्धव ठाकरेला कुणी संपवू शकत नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. माझ्या पाठीत वार करून मी संपणार नाही. मैदान सोडणारा मी नाही. तुमच्या ताकदीवर मी लढत आहे आणि लढत रहाणार असंही ते म्हणाले. हिंदू अभिमानी आहे. तसा मराठी भाषेचाही कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देवू. कपटाने वागाल तर उचलून आपटू. आम्ही आरएसएस भाजपवाले नाही. मरायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यावरही टिका करण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी सोडली नाही. काही झालं तरी एकनाथ शिंदे हे रुसतात. त्यामुळे त्यांची अवस्था रुसू बाई रुसू आणि गावाला जावून बसू अशी झाली आहे, अशी टिकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला,मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान

0

राष्ट्रवादी अजितदादा गट व शिंदे गटातील वाद विकोपाला?

महाड:-महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यापासून महायुतीमधील नेत्यांमध्ये चांगलीच धुसफूस सुरु झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पदातून डावलण्यात आलं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं.

मात्र, त्यानंतर भरत गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर त्यांच्या समर्थकांनी महामार्ग रोखत खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती, त्यामुळे चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.

अशातच भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही निवडणुकीत प्रामाणिक काम केलं, पण त्यांनी प्रामाणिक काम केलं नाही”, असा आरोप भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील वाद चांगलाच विकोपाला गेल्यामुळे आता यावर महायुतीमधील वरिष्ठ काय तोडगा काढणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. आम्ही व्यवहाराने चालणारे माणसं आहोत. आम्ही चुकीच्या पद्धतीने चालणारे माणसं नाहीत. आम्ही ज्या प्रमाणे निवडणुकीत काम केलं तसंच काम जर त्यांच्याकडून झालं असतं, तर त्याचा विचार केला गेला असता. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे काम करायचं. पण त्यांनी (सुनील तटकरे) आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मग ही कोणती रित? असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.

शिवसेनेच्या मेळाव्याकडे 2 आमदारांनी फिरवली पाठ,एकनाथ शिंदेंकडून स्वीकारला नाही सत्कार!

0

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन मेळावे मुंबईत गुरुवारी पार पडले. पण शिंदे गटाच्या मेळाव्यात नाराजीचे सूर पाहण्यात मिळाले.मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे दोन माजी मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी झालेल्या जयंती दिनी शिवसेनेनं मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात “शिवोत्सव मेळावा” आयोजित केला . या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते हजर होते. पण शिवसेना मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दूल सत्तार गैरहजर आहे. शिवसेना मेळाव्यात सर्व विजयी आमदारांचा सत्कार करण्यात आला. मात्र आमदार तानाजी सावंत आणि अब्दूल सत्तार यांनी या सत्कार सोहळ्यास अनुउपस्थित राहून त्यांची नाराजी पुन्हा एकदा उघड केली आहे.

महायुती सरकारच्या खातेवाटपामध्ये तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कापण्यात आला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते हे मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासह प्रमुख काही खातीही भाजपकडे गेली. तसंच भाजपकडून शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यास विरोध झाला होता. ज्या मंत्र्यांना संधी मिळाली होती, त्यांना पुन्हा संधी देऊन नये, अशी मागणी झाली होती. त्यानंतर अखेरीस अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली नाही. तेव्हा पासून दोन्ही नेते प्रचंड नाराज होते.

ठाकरे गटाच्या मेळाव्याकडे राजन साळवींनी फिरवली पाठ

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या मेळाव्यातही नाराजीची सूर पाहण्यास मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी मेळाव्याला गैरहजर होते. राजन साळवी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर गुरूवारी मेळाव्याला न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरेंना राम राम करत राजन साळवी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. यातच गुरूवारी मेळाव्याला गैरहजर राहत साळवींकडून ठाकरेंना संदेश दिला, असल्याची चर्चा रंगली आहे.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची शासकीय वसतिगृहाला भेट: विद्यार्थिनींशी साधला संवाद

0
गडचिरोली दि.२३: आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज रात्री गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या सोयीसुविधांबाबत आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शिक्षण आणि राहणीमानाच्या विकासासाठी शासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याबाबत मंत्री उईके यांनी माहिती घेतली.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीना उपस्थित होते.

पालक सचिव अंशू सिन्हा यांची*सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट*

0
धाराशिव दि.२३ – जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती अंशू सिन्हा यांनी आज २३ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अन्सारी तसेच प्रा आ केंद्र सावरगावं येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
श्रीमती सिन्हा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवाची पाहणी केली.यावेळी त्यांनी बाह्यरुग्ण विभाग,आंतर रुग्ण विभाग,प्रसुती गृह, शस्त्रक्रियागृह,प्रयोगशाळा विभाग,नेत्ररोग विभाग,असंसर्गजन्य रोग विभाग, लसकिरण विभाग,औषधी भांडार, अभिलेखा कक्ष इत्यादीची पाहणी केली.
शंभर दिवसाच्या ७ कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत सर्व विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय भेटी द्याव्यात व कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
सर्व रुग्णांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात याव्यात,याबाबत सूचना करून मार्गदर्शन केले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णास देण्यात येत असलेल्या सेवाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.काही सुधारणा करण्याबाबतही सुचना केल्या.
पालक सचिवांच्या भेटीप्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन परळीकर, आयुष जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विकास पवार तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांचे श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक च्या गुळ पावडर कारखान्यास भेट

0
धाराशिव – फक्त पुस्तकापुरते शिक्षण न देता पुस्तकाबाहेरील जग विद्यार्थ्यांना दाखवण्याच्या दृष्टीने एकलव्य विद्या संकुलात पार पडत असलेल्या उपक्रमांतर्गत एकलव्य प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेल्या ६१ विद्यार्थ्यांचे देवकुरुळी परिसरात अतिशय समृद्धतेने बहरत असणाऱ्या श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक च्या गुळ पावडर निर्मिती कारखान्यास भेट दिली या भेटीत ४२ मुले १९ मुली आणि पाच शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते.
भेटीच्या सुरुवातीस दिनेश कुलकर्णी यांनी कारखाना निर्मितीचा उद्देश सांगितला, तसेच फॅक्टरीमध्ये ऊस आणल्यापासून ते प्रत्यक्ष उत्पादने तयार होईपर्यंत कोणकोणत्या टप्प्यातून जातो कोणत्या टप्प्यावर उसावर कोणती क्रिया होते याची अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती विद्यार्थ्यांना दिले.त्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान उसाची गव्हाण हार्वेस्टरद्वारे कापलेल्या ऊसाला उतरून घेण्याची नवीन पद्धत तसेच शुगर ज्युस वर कोण कोणत्या रसायनांचा कशाप्रकारे परिणाम होतो याचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन माहिती दिली त्यानंतर स्टेनलेस स्टीलचा वापर सेंट्रीफ्यूज मशीनच्या वापराने गुळ पावडर आणि मोलॅसेस कसे वेगळे होते हे पाहिले. प्रत्यक्ष तयार झालेल्या ताजी गुळ पावडर खाण्याचाही विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.
तदनंतर पाणी पुनर्वापर यंत्रना उकळत्या पाण्याला थंड करण्याची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे विद्युत निर्मिती कशी होते याची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहून माहिती घेतली. शेवटी श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक च्या ऑफिस समोर त्यांच्या असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले ही क्षेत्र भेट यशस्वी होण्यासाठी श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी प्रत्यक्ष फॅक्टरी मधील मॅनेजमेंट केमिस्ट आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य झाले.
मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक भडंगे डीपी.शेंडगे सर, श्री.घुगे, श्री.देवकर सर आणि सुजाताताई गणवीर यांनी ही क्षेत्र भेट यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.