
गोरेगाव:- नगरपंचायत गोरेगाव येथील सफाई कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्याबाबतचे निवेदन विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना देण्यात आलेले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सफाई कामगार नगरपंचायत गोरेगाव येथे मागील चार वर्षापासून कार्यरत असून त्यांना शासनाच्या किमान वेतन कायदा १९४८ च्या नियमानुसार वेतन देण्यात येत नाही तसेच पीएफचे खाते न उघडता पीएफची रक्कम लंपास करून गरीब सफाई कामगारांचे लक्षावधी रुपये गहाळ करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप सफाई कामगार यांनी केलेला आहे. सफाई कामगार मागील पाच सहा महिन्यापासून कामापासून वंचित असून त्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
करिता गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नगरपंचायत गोरेगाव येथील सफाई कामगारांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना दिलेले आहे. सदर निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तालुका गोरेगावच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी किशोर बिसेन, अनिता मेंढे, महेंद्र पटले, राहुल ब्राह्मणकर, नितेश तरोने, समीर रंहागडाले, छाया मेश्राम, अमित ब्राह्मणकर, ओमप्रकाश चौधरी, आशिष नागपुरे, दुर्गाबाई कोसरे, लक्ष्मीबाई मेंढे, जशोदा गायधने, सरस्वता शिवनकर, शालिकराम मेहर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.





