
सालेकसा– सालेकसा तालुक्यातील सालेकसा आणि कोटजँमुरा अशा दोन धान खरेदी केंद्रांवर कार्यवाही करत धान खरेदी चा परवाना रद्द करण्यात आला होता. सध्या हलक्या सरीच्या धानाचे उत्पादन येणे सुरू झालेले आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी शासकीय व्यवस्था नसल्याने व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना करण्यात आली आहे. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक धान पिकाचा उत्पादन होत असून 90 टक्के लोकसंख्या ही केवळ धान पिकावर अवलंबून असते. शिवाय संपूर्ण शेतकरी खरीप हंगामात केवळ धान पिकाची लागवड करत असल्याने संपूर्ण वार्षिक उत्पन्न धान पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती खाजगी व्यापाऱ्याकडे विक्री करणे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून तात्काळ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी केली आहे.
विशेष म्हणजे तहसीलदार ए. बी. भुरे यांच्या माध्यमाने तत्काळ जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना संपर्क साधून सदर मागणी पूर्ण करण्यासाठी विनंती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, शहराध्यक्ष राहुल हटवार, शहर उपाध्यक्ष गोल्डी भाटिया, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष स्वप्निल करवाडे, उपाध्यक्ष मयूर पाथोडे व इतर मनसैनिक उपस्थित होते.





