नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर

उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

0
151
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तुळजापूर जवळील काकरअंबावाडी या गावातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला व त्यांच्या नुकसानाचा आढावा घेतला.

उस्मानाबाद(विशेष प्रतिनिधी)दि.18ः राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत प्रचंड नुकसान केले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिके ही आडवी झाली आहेत. याची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांची पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तुळजापूर जवळील काकरअंबावाडी या गावातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला व त्यांच्या नुकसानाचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन झालेल्या नुकसानाबाबत पवार यांनी माहिती गेतली. यासोबतच काही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पवारांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवादही साधला. झालेल्या नुकसानाचीही पाहणी केली. त्यानंतर पवार पुढील दौऱ्यासाठी सास्तूरकडे रवाना झाले आहेत.

या दोन दिवसांमध्ये शरद पवार हे तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे भेट देतील. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

शरद पवार यांनी यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. या दौऱ्याचा आढावा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. यानंतर राज्य सरकारने नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेतला होता. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मिळते हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.