30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ लोक समस्या सोडविण्याच्या तळमळीचे दर्शन

लोक समस्या सोडविण्याच्या तळमळीचे दर्शन

0
199

blank

भंडारा : घरा समोर बसलेले आंदोलक खरं तर कोणत्याही लोकप्रतिनिधींसाठी मनस्तापाचे कारण ठरू शकतात. परंतु काही लोक प्रतिनिधी अशा आंदोलनांना सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन आंदोलकांचे विषय मार्गी लावण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत असतील तर हा काहीसा वेगळाच अनुभव असतो. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर प्रधानमंत्री आवास योजनेच्या मागण्यांना घेऊन आंदोलन केले. दिवसभर खासदारांच्या घरासमोर ठिय्या मांडणार या आंदोलकांना पोलिसांनी बंदिस्त करून ठाण्यात नेले. खरं तर एखाद्या लोकप्रतिनिधी च्या दृष्टीने हा विषय संपला असता मात्र खासदारांनी त्यांचा जनसंपर्क दौरा टाकून थेट पोलिस स्टेशन गाठून आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या मागण्यांचे अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.
घरापर्यंत गाऱ्हाणी घेऊन आलेले आंदोलक नेहमी लोकप्रतिनिधींना नकोसे वाटतात. परंतु लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत धडपडणाऱ्या नेत्यांना मात्र हा विषय कधीच कटकटीचा वाटत नाही.  प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातील विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वात दोन नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. असंख्य कार्यकर्ते खासदारांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी धरणे दिले. घोषणाबाजीही करण्यात आली. मात्र खासदार सकाळीच मतदार संघाच्या दौर्‍यावर निघून गेले असल्याने आंदोलकांशी त्यांची भेट झाली नाही. खासदार येईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केलेल्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. हे माहित होताच दौरा टाकून खासदार थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याच ठिकाणी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मागण्यांच्या दृष्टीने ताबडतोब निर्णय घेतला जावा असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खासदारांच्या भूमिकेमुळे दिवसभर आंदोलन करणारे आंदोलकही सुखावले. केवळ लोकांची कामे व्हावीत यासाठी सदैव प्रयत्न करत राहणाऱ्या खासदार सुनील मेंढे यांनी या आंदोलकांना पोलिसांनी घेऊन गेल्यानंतरही वाऱ्यावर सोडले नाही हे विशेष.

blank