
तुमसर-भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चाहूल लागली असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाला शह देण्याकरीता तसेच छोट्या घटकाला समाज प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी मिळून तिसर्या आघाडीची स्थापना केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा तुमसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. त्यामुळे निवडणुकीला मुकलेले तसेच स्वतंत्ररित्या निवडणूक लढवून विरोधकांना घाम फोडणारे तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिलीप बन्सोड, तुमसर विधानसभेचे माजी आमदार अनिल बावनकर व साकोली विधानसभेचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी एकत्र येवून तिसर्या आघाडीची स्थापना केली असून यात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पदाधिकार्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या आघाडीचे अनिल बावनकर हे अध्यक्ष तर कार्यकारी अध्यक्ष दिलीप बन्सोड राहणार आहेत. पत्रकार परिषदेत बन्सोड यांनी या आघाडीत जाती पातीच्या राजकारणाला तडा देत नव्या दमाच्या व छोट्या घटकातील लोकांना समाजप्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार असल्याचे सांगितले असून दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या जागा लढविणार असल्याचा मानस असल्याचे सांगितले. तिसर्या आघाडीमुळे सत्तेचे समीकरण नक्की बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. त्यासाठी मागील काही महिन्यांपासून गावपातळीवर बैठका घेणे सुरू झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेत मच्छिमार संघटनेचे डॉ. रामकृष्ण शेंडे, महिला राजसत्ता आंदोलनच्या र%माला वैद्य, भोई समाजाचे टी. डी. मारबते, फोरमचे जयप्रकाश भवसागर, नंदकुमार मेर्शाम, राहुल साखरे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




