
कुही-अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार्या वाहनांसह तीन इसमांना गुरुवारी पहाटे कुही पोलिसांनी मांढळ मधील किन्ही फाट्यावर रंगेहाथ पकडले. यात देशी दारूच्या १९ पेट्यांसह ३,५९,५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुही पोलिस स्टेशनचे दारूबंदी रेडकामी गस्तीवर असणार्या एका पथकाला गुप्त माहिती मिळाली की, कुहीवरून एक मॅक्स महिंद्रा वाहनात अवैधरित्या देशी दारू भरून मांढळकडे जात आहे. यावरून कुही पोलिसांनी मांढळ गावातील किन्ही फाटा येथे प्रभावी नाकाबंदी करून कुहीकडून येणार्या मॅक्स महिंद्रा वाहनात दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्या तीन इसमाना रंगेहाथ पकडले. सदर वाहनांची पोलिसांनी चौकशी केली असता वाहनांमध्ये एकूण भिंगरी देशी दारूच्या १९ पेट्या अवैधरित्या आढळून आल्या. पोलिसांनी मोक्यावर जप्ती पंचनामा करून १९ देशी दारू पेट्यामधील एकूण ९६४ देशी दारूच्या निपा किंमत ४७,५२८रु.चा माल व एक मॅक्स महिंद्रा वाहन क्र. एम.एच.४९,सी ४२0९ किंमत ३ लाख रुपये तसेच दोन मोबाईल संच किंमत १२ हजार रुपये असा एकूण ३,५९,५२८ रु.चा माल जप्त केला. यातील आरोपी भाऊराव दत्तू खेडकर (३९) रा.वॉर्ड क्र.१७, कुही, सुधाकर तुलाराम चाचेरकर (३२) रा.वॉर्ड क्र.१७, कुही व मुकुंदा हरिभाऊ दुधपचारे (३५) रा.वॉर्ड क्र.६ कुही असे असून कुही पोलिसांनी कलम ६५(इ), (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कमलेश सोनटक्के, पोलिस उपनिरीक्षक अनिल दरेकर, पोलिस अंमलदार अरुण कावळे, गिरीधर राठोड, समाधान पवार यांच्या पथकांनी कारवाई करून पुढील तपास सुरू आहे.




