मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’नं उपस्थित केला प्रश्न

0
59

अमहदनगर: चीनच्या नाकेबंदीचा एक भाग म्हणून मोबाइल अप्लिकेशनसह अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आलेला चिनी मांजा अद्यापही खुलेआम पद्धतीने कसा विकला जातो, संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल एमआयएमने केला आहे. या धोकादायक मांजाची विक्री करणाऱ्या व्यापऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाने केली आहे. पक्षाचे नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या पाच सहा वर्षांपासून राज्यात चिनी मांजाला बदी आहे. तरीही या मांजाची विक्री सुरू असते. या प्रकरणी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. दरवर्षी राज्यात या चीनी मांज्यामुळे अपघात होतात. माणसे, जनावरे, पक्षी यांनाही दुखापत होते. अनेकांचा जीवही जातो. या घटनांची तात्पुरती चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नाही. कायद्यानुसार ही कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत. तरीही कारवाई होताना दिसत नाही. याचा अर्थ अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांची साटेलोट असल्याने कारवाई होत नसावी का, असा प्रश्न नागरिकांना पडतो. चिनी मांजामुळे कोणाचा गळा कापला गेला, कोणाचा गाडी चालवत असताना मांजात अडकून अपघात झाला, कोणी मरण पावला. अशा बातम्या येतात. तेवढ्यापुरती कारवाई होत असली तरी इतरवेळी खुलेआम विक्री सुरू असते. हा मांजा येथे येतो कसा, त्याची विक्री कोठे चालते, याची पुरेपूर माहिती प्रशासनाला असणारच. तरीही अशा व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे दिसून येते. अन्य चिनी वस्तूंवर बंदीची मोठी चर्चा होते. मात्र, खऱ्या अर्थाने धोकादायक असलेल्या चिनी मांजाकडे लक्ष दिले जात नाही. हा मांजा येथे येण्याचे आणि विक्रीचे मार्गच बंद झाले तरच यातून नागरिकांची सुटका होऊ शकते. आता संक्रात जवळ आली आहे. आपल्याकडे संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पंतग उडविले जातात. त्यासाठी मांजा आणण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच चिनी मांजावर लक्ष केंद्रीत करावे, त्याची विक्री आणि त्यासारख्या मांजाची निर्मिती येथे होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.