
नागपूर,दि.१६ ः- शेतकर्यांशी चर्चा न करता त्यांच्या विरोधातील कृषी कायदे तयार करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकार साठेबाज आणि भांडवलदारांसाठी काम करतेय्, हे आता स्पष्ट झाले आहे. सरकार भांडवलदारांचे गुलाम असून, आता शेतकर्यांनाही गुलाम बनविण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी नागपुरात केला.
कृषी कायदे आणि कामगारांसाठी असलेल्या कायद्यांविरुद्ध काँग्रेसने आज शनिवारी नागपुरात राज भवनाचा घेराव घालण्यासाठी रॅली काढली. या रॅलीला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. व्यासपीठावर अ.भा.काँ. कमिटीचे सचिव आशिष दुआ,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह मंत्री नितीन राऊत,मंंत्री विजय वडेट्टीवार,मंत्री सुनील केदार,मंत्री यशोमती ठाकूर, आमदार विकास ठाकरे, माजी आमदार राजेंद्र मुळक, आ. अॅड. अभिजित वंजारी, मुजफ्फर हुसेन,खासदार बाळू धानोरकर,आमदार सहसराम कोरेटे,सतिश चतुर्वेदी,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप,बी.एम.संदीप, सचिन नाईक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे,सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अनिस अहमद,आमदार संग्राम थोपटे,आ.राजू पारवे, आ. प्रतिभा धानोरकर, आ.वजाहत मिर्झा, इंटकचे अध्यक्ष एच. क्यू. जामा,आ.सुलभा खोडके, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, सरचिटणीस मोहन जोशी,रामकिशन ओझा,अभिजित सपकाळ,प्रवक्ते अतुल लोंढे,माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह राज्यभरातील काँग्रेसचे नेेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
विदर्भात अतिवृष्टीचा प्रश्न येताच आमच्या सरकारने शेतकर्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे सांगतानाच थोरात म्हणाले, आम्ही केवळ मोर्चे काढतो, घेराव घालतो, केवळ बाता करतो असे नाही. त्या आधी काम करतो नंतर हक्काने बोलतो. हे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. शेतकर्यांचा माल स्वस्तात खरेदी करणे, त्याची साठेबाजी करून कृत्रीम टंचाई निर्माण करणारे कायदे नष्ट झालेच पाहिजे. यासाठी आजचा हा घेराव कार्यक्रम आहे. शेतकर्यांसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे, असे थोरात यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी माणिकराव ठाकरे, सुनील केदार यांचीही भाषणे झाली. जो ‘किसान की बात करेगा, वही देश में राज करेगा’ ही केदार यांची घोषणा लक्षवेधी ठरली. आभार राजेंद्र मुळक यांनी मानले.
संसदेचा घेराव करू : नितीन राऊत
काळ्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 52 दिवसांपासून सिंघू सीमेवर धरणे देत आहेत. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही आलो आहोत. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढत आहेत. हे सरकार अन्नदात्यांचे आणि सर्वसामान्यांचे खिसे कापणारे आहे. आज आम्ही राजभवनाचा घेराव केला उद्या संसदेचाही घेराव करू, एवढी ताकत या शेतकर्यांत आहे, असे रॅलीला संबोधित करताना ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले.
आता काम की बात व्हावी : यशोमती ठाकूर
खुप झाली मन की बात आता काम की बात व्हायला पाहिजे. केंद्र सरकारला जागविण्यासाठी आजचे हे आंदोलन आहे. शेतकरी विरोधी कायदा रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिल्या. या रॅलीत आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी काटोल नाका चौकात मातीच्या चुली मांडून त्यावर भाकरी बनविल्या याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
ट्रॅक्टर रॅली
काटोल नाका चौकातून टॅक्टर रॅली काढण्यात आली. विजय वडेट्टीवार, सुनील केदार या मंत्र्यांसह आ. अभिजित वंजारी, आ. राजू पारवे यांच्या नेतृत्वात ही रॅली निघाली. या रॅलीत जवळपास 10 ते 15 टॅक्टर होते. प्रमुख नेत्यांशिवाय महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांचा यात समावेश होता. ही रॅली सभा स्थळी समाप्त झाली.
सदर मार्गावर वाहतुकीची कोंडी
सेमिनरी हिल्सकडून राजभवनाकडे येणार्या चौकाजवळ सभा स्थळ होते. या रॅलीची सुरुवात काटोल नाका चौकातून झाली. राज्यभरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते, मंत्री, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. सदर, गड्डीगोदाम, काटोल मार्ग, कोराडी मार्ग आदी ठिकाणी चारचाकी वाहने पार्क करून कार्यकर्ते सभास्थळी पायीच पोहोचले. रस्त्यावर ठिकठिकाणी महाविकास आघाडीची बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे झळकत होते. हा संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी गजबजल्याने सदर मार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली.




