
गडचिरोली दि. २८ जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याची आज गडचिरोली येथील अहेरी येथून जोरदार सुरुवात झाली.आज पहिली आढावा बैठक अहेरी येथे पार पडली. अहेरी, एटापल्ली, शिरोंचा अशा अतिशय दुर्गम भागातून पक्षाचे कार्यकर्ते संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते.
परिवार संवादाला आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.गडचिरोली भागात जलसंपदा विभागाचे विविध प्रकल्प, योजना सुरू आहे. हे काम जलदगतीने सुरू करण्यात यावे तसेच या सर्व योजना २०२४ पर्यंत कार्यान्वित करण्यात याव्यात अशा सुचना जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
मेडिगट्टा धरणाचा विषय सध्या गंभीर आहे. या भागातील काही भागात धरणाचे पाणी शिरले आहे. काहींना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे. मात्र काहीजण या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव आत्राम यांच्याकडे याचा तपशील द्यावा. जे शेतकरी पात्र आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
या परिवार संवाद दौर्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत आमदार धर्माराव आत्राम,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,आदींसह पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.





