
भंडारा,दि.06ः-नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याना ५० हजार सानुग्रह देण्यात यावे व आशा वर्करर्सला १५००० हजार मानधन देण्यात यावे आणि या दोन्ही विषयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात भेटून निवेदनाव्दारे त्यांनी ही मागणी केली आहे. सरकारने शेतक-यांची कर्जमुक्ती करतांना नियमित कर्जाची फेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती.
मात्र तुटपुंजे सानुग्रह अनुदान शेतक-यांना दिले जात आहे. नापीक रोगराईमुळे धानउत्पादक शेतकरी त्रस्त असतांनाही नियमित कर्ज फेडत असतो. अशा नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना दिलासा देणे गरजेचे असून अर्थसंकल्पात याची तरतूद करुन शेतक-यांना हे अनुदान देण्याची मागनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. याच सोबतच कोरोना काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणा-या आशा वर्करच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुटपुंज्या मानधनावर २००९ पासून आशा वर्कर काम करीत आहेत. आरोग्य सेवा सबळ करण्यासाठी आशा वर्करला आर्थिक बळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांप्रमाने किमान १५००० रु. इतके मानधन आशा वर्करर्सला देण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. या बाबीचा अर्थसंकल्पात समावेश करण्याची मागणीसुध्दा आ. भोंडेकर यांनी केली आहे.





