
=>
अश्लेष माडे यांची मागणी
कोसमतोंडी,दि.3(महेंद्र टेंभरे):- कोरोनामुळे मागील वर्षीपासून सतत लॉकडाऊन सुरु असल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून त्याच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्याचवेळी मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिराच्या देखरेखसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी.
महाराष्ट्रात 35 लाखांहुन जास्त बलूतेदार गुरव समाजाची लोकसंख्या आहे. त्यांचा पारंपरिक उदरनिर्वाहाचा मार्ग ‘‘ग्रामदेवतांची पूजा अर्चा, साफसफाई, दिवाबत्ती’’ करणे हा आहे. या मंदिरांची पूजा अर्चा, साफसफाई, दिवाबत्ती करून भाविकांकडून मिळणा-या दक्षिणेतून व बलुतेदार पद्धतीने गावातून मिळणा-या शिधा व वार्षिक पेंडी काडीचे बलुते यातून बलूतेदार गुरव समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतू, मागील तीन महिन्यापासून यातून मिळणारे उत्पन्न देखील पूर्ण बंद आहे. लाँकडाऊनमुळे राज्यातील 41हजार पेक्षा जास्त मंदिरे बंद आहेत. यामध्ये देवस्थान इनाम जमीन असलेली मंदिरे – 18 हजार 387 आणि ग्रामदेवतेची इतर मंदिर संख्या – 22 हजार 623 आहे. “गुरव समाज” हा इसवी सन. 6 व्या, 7 व्या शतकापासून गावगाड्यातील एक बलुतेदार घटक म्हणून गावच्या सेवेपोटी ग्रामदेवतांची, पूजा अर्चा, मंदिर साफसफाई, दिवाबत्ती, अशी सेवा करून “देवासमोर येणाऱ्या किरकोळ दान दक्षिणेवर आणि घरोघरी जाऊन मागीतलेला पीठ-मीठ, कोरडा शिधा व वर्षाकाठी शेतकरी बांधवाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या बलुत्यावर वर्षानुवर्षे गांवात सुख, शांती, ऐश्वर्य, शांतता नांदावे म्हणून देवतांची मनोभावे पूजा करून गावाचे भले होवो अशी मनोभावे प्रार्थना करून गुरवसमाज जगत असतो.
मात्र कोरोना या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन नेमका सुगीच्या लग्नसराईच्या व गावोगावच्या ग्रामदेवतांच्या यात्रा, वार्षिक उत्सवांच्या काळात झाला आहे. या सुगीच्या काळात मिळणा-या उत्पन्नावर बारा बलुतेदार वर्षाची आर्थिक बेजमी करीत असतो. परंतू बलुतेदारांचे इतर सर्वच दैनंदिन मिळकतीचे व्यवसाय बंद झाल्यामुळे हा समाज दुहेरी संकटात सापडला आहे. अशा दुहेरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या गावगाड्यातील गुरव समाजाला आर्थिक मदत करावी.अशी मागणी अश्लेष माडेयांनी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.





