37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ हैदराबादेत सिंहाना कोरोनाः नागपूरमध्ये अलर्ट

हैदराबादेत सिंहाना कोरोनाः नागपूरमध्ये अलर्ट

0
56

blank

नागपूर,दि.6 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहा:कार माजला असून राज्यात रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त माणसेच नव्हे तर प्राण्यांनासुद्धा कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. हैदराबाद येथील तब्बल 8 सिंहाना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते. याच कारणामुळे आता राज्यातील विविध प्राणी संग्रहालयांमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांचे रक्षण व्हावे म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमावली तयार करण्यात आली आहे.

नागपूर येथील महाराज बाग प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. वाघ, अस्वल, बिबट, हरीण असे प्राणी पाहण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, कोरोनामुळे हे प्राणी संग्रहालय सध्या बंद आहे. असे असले तरी प्राण्यांनासुद्धा कोरोना होऊ शकतो हे समोर आल्यानंतर येथील प्रशासन प्राण्यांची विशेष काळजी घेत आहे. त्यासाठी येथे खास नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार प्राण्यांची देखरेख केली जात आहे.

महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केलेली असणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. तसेच प्राण्यांना कोणतेही अन्न देण्यापूर्वी ते गरम पाण्यात उकळण्यात येत आहे. प्राणी संग्रहालयात सामान्यांना येण्यास बंदी घालण्यात आलीये. कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त अन्य व्यक्तींना येथे प्रवेश नाही. तसेच येथील प्राण्यांमध्ये कोरोनासदृश लक्षणं आढळून आल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे.

कोणत्याही प्राण्याला कोरोनसदृश लक्षण नाही

दरम्यान, नागपूर येथील महाराज बाग प्राणी संग्रहालय शहराच्या मध्यभागी आहे. या संग्रहालयात मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत. या प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी येथील प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या येथे कोणत्याही प्राण्याला कोरोनासदृश लक्षणं नाहीत.

blank