एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक बदलीवर गोंदियात

0
139

मुंबई,दि.6 : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांचे दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात बदली करण्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे एटीएसमधून दया नायक यांची गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात आली आहे.  

गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते.या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावे लागले होते.

कोण आहेत दया नायक ?

  •  मुंबई पोलिसमध्ये सध्या निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे.
  •  1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
  •  प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी गुन्हे शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.
  •  1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास 80 एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत.
  •  दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.
  •  बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलिस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती.
  •  2012 साली दया नायक यांना सेवेत परत घेण्यात आले. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला नियुक्ती मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होते.
  •  त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आले. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या जुहूचौकी युनिटचे प्रमुख आहेत.