
काँग्रेस व भाजप पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेसह कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेतकर्यांच्या समस्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता झटत असतात. त्यातल्यात्यात गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव कटिबध्द आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाची भुमिका मांडून संघटन मजबुत करावे, असे आवाहन खा.प्रफुल पटेल यांनी केले.
स्थानिक पीपी कॉलेजच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते संबोधित करताना बोलत होते. यावेळी खा.प्रफुल पटेल पुढे म्हणाले, आपण आणि आपले पक्ष सदैव शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या व प्रश्न वेळोवेळी मार्गी लावण्याचे काम करीत आहोत. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आपले प्रयत्न सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसरा व तिसर्या टप्प्याचे कामे, गोंदिया शहराच्या विकास शृंखलेची रखडलेली गटार योजना, भुमिगत विद्युत प्रकल्प या शिवाय जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. या कामांना अधिक वेग देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गाशी लढा उभारत असताना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अनुसंगाने आपण आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते सातत्याने पुढे राहिले आहेत. त्यामुळेच आज गोंदिया जिल्हा संसर्ग वाढीला ब्रेक लावण्याच्या दृष्टीकोनातून मॉडल ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेच्या जनभावनेशी जोडलेली आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाची कामे आणि भुमिका सर्वसामान्यापर्यत पोहोचवून संघटनेला आणखी मजबुत करावे, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकार्यांमुळे गोंदिया जिल्ह्यात पक्षाला नव उभारी मिळणार, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, अनुसूचित विभागाचे प्रदेश सचिव सुनिल भालेराव, माजी न.प.सभापती गज्जू नागदवणे, माजी नगराध्यक्ष रमेश ठवरे, काँग्रेस अनु.जाती सेलचे महासचिव लक्ष्मीकांत डहाट, काँग्रेस सेवादलचे माजी संघटक प्रदिप ठवरे, भाजप अनु.जाती युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख वसंत गणवीर, डॉ.राजेंद्र वैद्य, बशिर कुरैशी, कबीर सुखदेवे, माजी न.प.सभापती विकास शेंडे, पैयाज पठाण, मिलिंद नागदवणे, आकाश गडपायले, नेतराम गौतम, किशोर गजभिये, सुदर्शन वाहने, बेंजामिन लॉरेंन्स, नौशाद जाफरी, डेजमंड सतुर, महेंद्र शेंडे, धिरज रूपारेल, रामप्रसाद गौतम यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, के.आर. शेंडे, अशोक सहारे, विनोद हरिणखेडे, माजी नगराध्यक्ष के.बी.चौहान, शिव शर्मा, आशा पाटील, सुशीला भालेराव, विनित सहारे, रफीक खान, केतन तुरकर, मनोहर वालदे,नानू मुदलियार, प्रतीक भालेराव, विष्णू शर्मा, सुनील पटले, शैलेश वासनिक, यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.





