
सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली, यावेळी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. संपूर्ण राज्यासह चंद्रपूरातही कोरोनाच्या दुस-या लाटेने आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण निर्माण केला होता. यावेळी आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता कंत्राटी पध्दतीवर कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या. या काळात या कर्मचा-यांनी स्वताच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणीक प्रयत्न केले. परिणामी चंद्रपूरात कोरोनातून बरे होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामूळे सदर कर्मचा-र्यांना हळूहळू कामावरुन कमी करण्यात येत आहे. मात्र संकटकाळी रुग्णसेवा देणा-या या कर्मचा-यांना कामावरुन कमी करणे योग्य नाही. तसेच संभावित तिसरी लाट आल्यास पून्हा आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊ शकते. या सर्व पाश्र्वभुमीवर सदर सर्व कंत्राटी कर्मचा-यांना कर्त्यव्यावर कायम ठेवण्यात यावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिका-यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.