
भंडारा,दि.09-:शेतकऱ्यांच्या इ पिक पेराची अट रद्द करा आणि इ- पिक पेरा ची जबाबदारी शेतकऱ्यांवर न टाकता शासनाने शासकीय यंत्रणेमार्फत सातबारा अद्यावत करावे अन्यथा भाकप व किसान सभेतर्फे आंदोलन करावे लागेल असा निर्णय भाकप च्या भंडारा जिल्हा सचिव मंडळाच्या सभेत करण्यात आल्याची माहिती भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी दिली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा जिल्हा सचिव मंडळाची विस्तारित सभा दिनांक 7 ऑक्टोबर 2021 ला राणा भवन भंडारा येथे कॉम्रेड माधवराव बांते यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
सर्वप्रथम सुरेवाडा तालुका जिल्हा भंडारा येथील पक्ष सभासद व कार्यकर्ते कॉम्रेड राजू कासवकर तसेच लखिमपुर खीरी येथील शेतकरी हत्याकांडात मृत्यू पावलेल्या आंदोलनकारी शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तदनंतर पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी मागील सभेच्या आढावा सादर केला व पुढील कार्यक्रमाच्या रूपरेषेची मांडणी केली.
सभेत संघटनात्मक विषय, किसान कामगारांचे प्रश्न, जिल्ह्यात विशेषतः साकोली तालुकेत सुरु असलेली मनरेगा बचाव मोहीम, पक्ष साहित्य, आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका तसेच पुढील विधानसभेच्या निवडणुका, उमेदवार व मतदार संघ इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली व खालील निर्णय घेण्यात आले.
यात- ई-पीक पेरा ची शेतकऱ्यांवर जबाबदारी न टाकता शासनाने शासकीय यंत्रणेमार्फत सातबारा अद्यावत करावे व या वर्षी धान्य खरेदीसाठी ई पिक पेरा ची अट रद्द करावी अन्यथा भाकप व किसान सभेला आंदोलन करावे लागेल. पक्षातर्फे जिल्हा परिषदा, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणूका लढविण्यात येतील. तसेच पक्षातर्फे साकोली व भंडारा विधानसभेची निवडणूक सुद्धा लढविण्याचा व पूर्वतयारीचा निर्णय घेण्यात आला.लखिमपूर शेतकरी हत्याकांडाचा निषेध करून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचा व मागण्यांचा समर्थन करण्यात आला तसेच मनरेगा वाचविण्यासाठी जिल्हाभर मोहीम करण्याचा तसेच कामाचे दिवस व वेतन वाढविण्याची मागणी करण्यात आली. सभेचा समारोप सभाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बनते यांनी केला. तर आभार प्रदर्शन काॅ. गजानन पाचेे यांनी केले. सभेला पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य व जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड सदानंद इलमेे, कॉम्रेड माणिकराव कुकडकर, कॉम्रेड जयप्रकाश मसरके, कॉम्रेड भूपेश मेश्राम, कॉम्रेड ग्यानीराम नेवारे,काॅ. दिलीप ढगे,काॅ. ताराचंद आंबाघरे,काॅ. दिलीप उंदिरवाडे,काॅ. रत्नाकर मारवाडे, काॅ.वामनराव चांदेवार,काॅ. विशाल इलमेे काॅ.तुकाराम बांते आदींची उपस्थिती होती.





