
सडक अर्जुनी,दि.08 – जिल्ह्याच्याच नव्हे तर मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षीय राजकारण सोडून विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.निवडणुकीनंतर कुणी जिंकेल कुणी हरतो मात्र त्यानंतर आपल्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी ही सर्वच पक्षीय नेत्यांची असल्याने सर्वांनी पक्षभेद सोडून विकासासाठी एकत्र यावे असे विचार अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे आमदार मनोरहराव चंद्रिकापूरे यांनी व्यक्त केले.
ते दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सडक अर्जुनीच्या वतीने तेजस्वीनी लॉन येथे आयोजित कार्यक्रमात (दि.07)बोलत होते.यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, अध्यक्ष रोहयो समिती व आमदार मनोहर चंद्रिकापुरे,माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परसुरामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुर्हे,बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार,माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, ठाणेदार सचिन वांगळे, माजी सरपंच डी. यु. रहांगडाले, मंजुषा चंद्रिकापुरे,महिला तालुका अध्यक्ष रजनी गिर्हेपुंजे,माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य मंजू डोंगरवार, नरेश भेंडारकर, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, मिलन राऊत, एफ.आर.टी शाह, दुलाराम चंद्रिकापूरे,प्रभूदयाल लोहिया व अन्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मंत्रालयातील वरिष्ठ सचिवांनी दिल्याचे सांगितले.
त्यामुळे जिल्ह्यातील समस्त ग्राम पंचायत सरपंचांनी पक्षपात सोडुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी एकत्रित येऊन आपल्या गावाचे नियोजन करून कामे करावे त्यासाठी मी सर्वांसोबत आहे.जिल्ह्याच्या प्रत्येक ग्राम पंचायतीला एक कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.रोजगार हमीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना काम उपलब्ध होतील आणि कुणीही जिल्ह्याबाहेर काम करण्यासाठी जाणार नाही. त्यामुळे रोजगाराचे प्रश्न सुटेल असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश काशिवार यांनी केले तर आभार आशिष येेेरणे यांनी मानले.





