
गोंदिया,दि.13ः- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसपक्षाचे योगदान विसरणारे नसून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त केले.त्यावेळीही आत्ताच्या भाजप म्हणजे जनसंघासह आरएसएसच्या लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही.त्यांनी नेहमीच स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधातच काम केल्याने त्यांच्याकडून देशहिताची अपेक्षा करणे चुकीचे आहे,ते देशद्रोहींना पाठिंबा देणारे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.ते गोंदिया येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित जिल्हा मेळावा व पदग्रहण सोहळ्यासाठी आले असता पत्रकारपरिषदेत बोलत होते.
पत्रपरिषदेला आमदार अभिजित वंजारी,आमदार सहसराम कोरेटे,प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,कार्याध्यक्ष अशोक गुप्ता,प्रदेश सचिव पि.जी.कटरे,प्रदेश महासचिव अमर वराडे,माजी आमदार मधु भगत,प्रदेश महासचिव नामदेवराव किरसान,रत्नदिप दहिवले,जितेंद्र कटरे,जितेश राणे,डाॅ.झामसिंह बघेले आदी मान्यवर उपस्थित होते..
पटोले पुढे म्हणाले की,ज्या सिनेअभिनेंत्रीला केंद्रसरकारने पद्मश्रीकरीता निवडले तिने देशाच्या स्वातंत्र्यावरच आक्षेप घेणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुबिंयासह सर्व देशवासियांचा अवमान केलेला आहे.याअगोदर याच अभिनेत्रीने मुबंईला पीओके म्हणत आपल्या अकलेचे तारे तोडले होते.अशा अभिनेत्रीला दिलेला पद्मश्री पुरस्कार लगेच परत घ्यायला हवे,परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे आरएसएसच्या अजेंड्यावर काम करीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे म्हणाले.
धानाला बोनस मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु
गेल्या दोन वर्षापासून सातत्याने धानाला 700 रुपये बोनस मिळत आहे.यापुर्वी कोरोनाची परिस्थीती जेवढी भयावह होती,त्यास्थितीत शेतकर्यांना महाविकास आघाडी सरकार बोनस देऊ शकते,तर सध्या तर कोरोना नियंत्रणात आले असून सरकार आत्ता कामाला लागले आहे,त्यामुळे शेतकर्यांना यावेळीही बोनस मिळेल यासाठी विधानसभेत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच
काँग्रेस पक्ष नेहमीच आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी पुढे राहिलेला असून आजपर्यंत झालेल्या सर्वच पोटनिवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच आघाडीवर राहिलेला आहे.त्यामुळे येत्या जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काँग्रेस पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टीनेच स्वबळावर लढण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.





