34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

0
43

blank

माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषेदवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच जिल्हयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर आता हिंगोली जिल्हयात काँग्रेसला बळ मिळणार आहे.

माजी खासदार राजीव सातव यांचे कोविडमुळे निधन झाल्यानंतर हिंगोली जिल्हयात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संभ्रमाची स्थिती झाली होती. त्यातच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सातव कुटुंबियांचे राजकिय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. या शिवाय गांधी परिवार व काँग्रेस पक्ष सातव कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली होती.

दरम्यान, विधान परिषदेच्या शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार डॉ. सातव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपाने संजय केणेकर यांचा अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत मतदान होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डॉ. सातव यांची बिनविरोध निवड होण्यासाठी प्रयत्न चालविले होते.

त्यानंतर आज भाजपाचे केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. सातव यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त कळताच हिंगोली जिल्हयात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माजी आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, नगरसेवक अनिल नेनवाणी, विलास गोरे, माबूद बागवान, केशव नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हयात काँग्रेसला बळ मिळणार

हिंगोली जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसच्या आहेत. मात्र हिंगोली विधानसभा भाजपाकडे, कळमनुरी शिवसेनेकडे तर वसमत विधानसभा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आता डॉ. सातव यांच्या रुपाने काँग्रेसला नवीन आमदार मिळाल्याने जिल्हयात काँग्रेसला बळ मिळणार आहे.

blank