
उमेदवारांनी कसली कंबर : पुराडा जि.प. क्षेत्र महिला राखीव
देवरी–. घराणेशाही राजकारणाला विरोध करण्यासाठी भाजपचे माजी सभापती सुनंदा बहेकार यांना पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपला हक्काचा उमेदवार म्हणून पसंती दाखविली. नागरिकांची पसंती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून सुनंदा बहेकार यांनी मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी आमदार सहेसराम कोरोटे यांच्या निवासस्थानी अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षात खिंडार पडल्याचे दिसून आले आहे.
देवरीच्या राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेचा क्षेत्र म्हणून ओळख असलेला पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक दिग्गजांनी आपले नशीब आजमावले. नवीन आरक्षण सोडत येण्यापूर्वी सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे अनुभवी राजकारणी व्यक्तींनी आपली कंबर कसली होती आणि मेहनतदेखील घेतली. नवीन आरक्षणानुसार पुराडा जिल्हा परिषद क्षेत्र महिला राखीव आरक्षणात आले. त्यामुळे माजी आमदार संजय पुराम आणि माजी सभापती सविता पुराम यांचे पुराडा हे गृहक्षेत्र असल्याने भाजपचा तिकीट पुन्हा सविता पुराम यांना मिळत असल्याने घराणेशाही राजकारणामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले. दरम्यान, नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्साह बघून माजी सभापती सुनंदा बहेकार यांनी मंगळवारी आमदार सहेसराम कोरोटे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केले. आमदारांनी काँग्रेसचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी संदीप भाटिया, अविनाश टेंभरे, किरण राऊत, सुनंदा बहेकार, कोमेंद्र मेंढे, प्रदीप परिहार, उर्मिला डोये, भेगराज पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीत चांगलीच रंगत येणार
पुराडा जिल्हा परिषद क्षेत्र समस्यांचे माहेरघर आहे. रस्त्यापासून, पाणी टंचाई, आरोग्याच्या सोयी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यास जनप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचा रोष बघावयास मिळत आहे. आश्वासनाशिवाय कुठलाही काम लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. कंत्राटदार रस्त्याचे काम अर्ध्यावर सोडून पडतात. परंतु, निवडून दिलेले प्रतिनिधी समस्या गांभीर्याने घेत नसल्यामुळे या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या आगामी निवडणुकीत रणसंग्राममध्ये चांगलीच रंगत येणार आहे.
पुराडा क्षेत्रात 12 ग्रामपंचायती
पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत 12 ग्रामपंचायती येतात. यात लोहारा, सुरतोली, ओवारा, सावली, डोंगरगाव, देवाटोला, हरदोली, ढिवरीटोला, शिलापूर, फुक्कीमेटा, पुराडा, मुरपार असे एकूण 12 ग्रामपंचायतींचा समावेश आहेत.





