33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र गोपीनाथगड स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा

गोपीनाथगड स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा

0
31

blank

परळी वैजनाथ- तालुक्‍यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या “गोपीनाथगड‘ या स्मारकाच्या लोकार्पण व याचठिकाणी उभारण्यात आलेल्या मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी (ता.12) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री सानप आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

तालुक्‍यातील पांगरी येथील वैद्यनाथ कारखान्याच्या परिसरात सुमारे अठरा एकर शेतजमिनीवर हे स्मारक उभारण्यात गेले आहे. गेल्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यावेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कामगार मंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विकास सावरा, अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार महादेव जानकर, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, ऍड. लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी कारखाना परिसरात पूर्ण झाली असून तगडा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रज्ञाताई मुंडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे-खाडे, यशश्री मुंडे, गौरव खाडे, अमित पालवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. 

असे आहे स्मारक
गोपीनाथगड या स्मारकाच्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची सुमारे 22 फूट एवढी असून तो कोल्हापूर येथे बनवण्यात आला आहे. सुमारे दहा महिने हा पुतळा बनवण्यासाठी लागले आहेत. दहा फूट उंच चबुतऱ्यावर हा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्याच्या बाजूला 72 फूट उंच व 111 फूट व्यासाचे कमलपुष्प तयार करण्यात आले असून कोलकत्ता येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 50 मजुरांनी गेली अनेक महिने अहोरात्र परिश्रम घेऊन हे अष्टकोनी घेर असलेले कमलपुष्प तयार केले आहे. या स्मारकाच्या सभोवताली विविध प्रकारचे झाडे, फुलझाडे, फुलवेली, लॉन, कारंजे असणार आहेत. त्यामुळे एकूणच या स्मारकाचा परिसर भव्यदिव्य आणि नयनरम्य असणार आहे. या स्मारकाच्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी, राजकीय कारकीर्द, त्यांचा संघर्ष, सामाजिक कार्य या साऱ्या गोष्टी असणार आहेत. शिवाय हे ठिकाण उद्योग, शिक्षण एक प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित होणार आहे. येथे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, उद्योग आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्याचे केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे. येथे अन्नछत्रही चालवले जाणार आहे. पंकजा मुंडे-पालवे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे-खाडे, ऍड.यशश्री मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाचे काम करण्यात आले आहे. 

blank