
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय (Obc Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर अखेर राज्यपालांनी सही ( Governor) केली आहे, त्यामुळं याचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी दिली.त्यामुळं आता आगामी निवडणुका पुढे ढकलल्या जातील का? यासंदर्भात आता निवडणूक आयोगीच भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार म्हणाले, मी आपल्याला आनंदाची बातमी सांगतो की, राज्यपालांनी विधेयकावर सही केली आहे. आज यासंदर्भात कायदा सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना सर्व बाबी लक्षात आणून दिलं की या अध्यादेशावर तुम्ही सही केली होती. याचं कायद्यात रुपांतर करत असताना सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमतानं हे विधेयक मंजूर केलंलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरु होती, त्यात आपण मंजूर केलेल्या विधेयकावर फार काही मत कोर्टानं व्यक्त केलेलं नाही.हा सर्व विषय सविस्तर ऐकून घेतल्यानतंर राज्यपालांनी यावर सही केल्यानं आता हा विषय संपला आहे. याबद्दल मी राज्यपालांचे आभार मानतो. तसेच त्यांना धन्यवाद देतो. तसेच राज्यातील जनतेचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमतानं जे विधेयक मंजूर केलं त्यावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्यानं राज्यात एक चांगलं वातावरण तयार झालं आहे.





