
गोंदिया,दि.04: सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, तो सर्व महाराष्ट्राला लाजवणारा व्यवहार चाललेला आहे आणि यामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. ज्या प्रकारे परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नसतील, पर्यावरण मंत्रीही राजीनामा देणार नसतील, तर मग अनिल देशमुख यांचा राजीनामा कशाला घेतला, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार डाॅ.परिणय फुके,उपेंद्र कोठेकर,माजी आमदार हेमंत पटले उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा अपघातात मृत्यू झाला होता. रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील आज तिरोड्याला(खमारी) आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. लोकांना निवडणुका येईपर्यंत थांबावे लागते, पण आम्ही नाही थांबू शकत नाही. कारण अनिल देशमुख यांच्यावरदेखील परमवीर सिंह यांनी आरोपच केले होते. त्यापुढे काही झाले नव्हते, चौकशी पुढे जायचीच होती आणि राजीनामा घेतला गेला. अन् आता तर अनिल देशमुखांना सर्वांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पाटील म्हणाले.





