
गोंदिया,दि.25ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत सुरु असलेल्या अव्यवहारात्मक कामाला घेऊन आणि निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यासह आमदार,खासदारांनी केलेल्या तक्रारींच्या आधारावर विद्यमान प्रभारी कार्यकारी अभियंता ललीत मुंदडा यांच्याकडून प्रभार काढून घेत आज(दि.25)शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागा कार्यकारी अभियंताचा अतिरिक्त प्रभार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत.मुंदडा यांच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रकारच्या तक्रारीच्या अनुषंगाने वृत्तपत्रात बातम्या सुध्दा प्रकाशित झालेल्या होत्या.आता बेलपात्रे यांच्याकडे प्रभार गेल्याने बेलपात्रे कशापध्दतीने बांधकाम विभागाला हाताळतात याकडे लक्ष लागले आहे.





