
अर्जुनी-मोर,दि.25ः- गेल्या दोन दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना पक्ष बांधणी व संपर्क अभियानामधून गेल्या दोन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन जनसामान्यांचा समस्या ऐकून घेतल्या.त्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी तसेच गावागावांमध्ये शिवसेना पक्षाची शाखा स्थापन करून शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी हा दौरा आहे.सोबतच अर्जुनी मोरगाव येथे उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्याकडे दौरा अहवालात उल्लेख करणार असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी येथे(दि.24)पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी खा.विचारे यांनी सांगितले की गोंदिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये बंद असलेली उपकरणे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.सोबतच जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत कार्यालयात कंत्राटी कर्मचार्यांच्या अंदोलन स्थळाला भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून येऊन रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्यासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न केले.अर्जुनी-मोर येथील रेल्वे फाटक वारंवार बंद होत असल्याने वाहतूक विस्कळीत होत असते,त्यामुळे अंडरग्राउंड पुलिया बांधकाम करण्यात यावे. वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टेदेण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.एकंदरीतच सामान्य जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा संपर्कप्रमुख बाळा परब, सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरे, गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू,पंकज यादव, जिल्हा समन्वयक सुनील लांजेवार, उपजिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल, तालुकाप्रमुख होमदास ब्राह्मणकर, अर्जुनी-मोर नगरपंचायतचे बांधकाम सभापती संजय पवार,अश्विनी गौतम,प्रकाश उईके,शिल्पा घनाडे, प्रतिभा वावरे, ममता पवार, यादव कुमरे, विजय पशिने व इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.





