34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी

0
31

blank

गोंदिया,दि.१५ : पोलिओ रोगाचे समुळ उच्चाटन व्हावे व संपूर्ण देश पोलिओमुक्त व्हावा याकरीता राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. सन २०१५-१६ यावर्षी दि.१७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ८ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, निवासी वैद्यकीय अधिकारी विनोद वाघमारे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.आर.पी.गहलोत, पोलिओ सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी नागपूरचे डॉ.मोहम्मद साजिद उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी मोहिमेत सहभागी आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. बुथवरील लसीकरण योजनेमध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख ९ हजार ९२५ बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहिमेतील एकूण बुथची संख्या १३८७ असून ग्रामीण भागात १२६५ व शहरी भागात १२२ बुथ राहतील. या मोहिमेमध्ये ३१८६ मनुष्यबळ कार्य करणार असून २८६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे.
आयपीपीआय कृती योजनेअंतर्गत बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस लसीकरण करण्यात येईल. यामध्ये सर्व क्षेत्रात पाडे/वस्त्या/विटभटया, शेतात राहणारे मजूर, मुस्लिमवस्ती, मेंढपाळ, परप्रांतातून आलेले कुटुंबे, धाबे, शेतावरील घरे, बांधकामाची ठिकाणे, शहरालगतचा भाग, झोपडपट्या, पहिल्या दुसऱ्या मजल्यावरील घरे, ज्या भागात नकारार्थी लाभार्थ्याचे कार्यक्षेत्र आहे, प्राथमिक लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी व अशा सर्व क्षेत्रात घरोघरी लसीकरण राबविण्यात येणार आहे. पोलिओ समुळ नष्ट होवून मोहीम यशस्वी होण्याकरीता एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणाचे जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.

blank