दक्षिण-मध्य सांस्कृतीक कार्यक्रमात १७ रोजी गांगल्याची दंडारचे सादरीकरण

0
16

गोंदिया,दि.१५ : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील सांस्कृतीक वारसा म्हणून दंडार प्रचलीत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ही लोककला जिवंत ठेवण्याचे निरंतर कार्य गोंदिया जिल्ह्यातील दुलीचंद बुध्दे करीत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील गांगला गावातील वय वर्षे १० ते १४ वयोगटातील मुलांची दंडार १७ जानेवारी रोजी भारत सरकारच्या वतीने आयोजित कला महोत्सवात सादर करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतीक नागपूर येथील केंद्रात आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्र या पाच राज्याच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या सांस्कृतीक केंद्राच्या नियंत्रणाखाली दिनांक ८ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान आयोजित कला महोत्सवात १७ जानेवारी रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत महाराष्ट्राची कला म्हणून गांगल्याची दंडार सादर करण्यात येणार आहे.
या दंडारीच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील शाहीर मधुकर बांते, झाडीपट्टीचे जीवनदादा लंजे, शैलेंद्र वनवे, शाहीर संकर चामट, मुन्ना शहारे, श्रीराम मेश्राम यांच्या गाणगवळणीने सुरुवात तर कार्यक्रमात जिल्ह्याचे नैसर्गीक वर्णन जीवनदादा लंजे हे तुमडा गिताच्या माध्यमातून करतील. ही दंडार वाचविण्यासाठी वाचविण्यासाठी सेवानिवृत्त उपायुक्त अनिल देशमुख, अधिकारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, नागपुरचे दिलीप जायसवाल, इंजिनियर डी.यु.रहांगडाले, संदिप जैन, डॉ.अजय बिरनवार, विठ्ठलराव भरणे, लिलाधर पाथोडे प्रयत्नरत आहेत. या दंडारीचे कार्यक्रम नागपूर येथील यु.सी.एन. वाहिनीवर थेट प्रसारण होणार असल्याची माहिती अधिकारी/कर्मचारी समन्वय समितीचे दुलीचंद बुध्दे यांनी दिली.