34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय नाना पटोलेंची घोषणा:महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे एक कुटुंब एक तिकीट

नाना पटोलेंची घोषणा:महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे एक कुटुंब एक तिकीट

0
89

blank

नागपूर–राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून एक कुटुंब, एक तिकीट धोरण राबवले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर युती केल्याने सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.

काँग्रेसशिवाय पर्याय नाही
नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाजपने गेल्या आठ वर्षांत देशाला 50 वर्ष मागे नेले आहे. आता काँग्रेसमध्ये येणाऱ्या निवडणुकांत एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल. महापालिका निवडणुकीतही हाच कित्ता गिरवला जाईल. आगामी काळात काँग्रेसकडून देशात जनजागरण मोहीम राबवली जाणार आहे. देशाला महासत्ता काँग्रेसने बनवले. सत्तेसाठी काहीही करायचे, ही काँग्रेसची भूमिका राहिलेली नाही. काँग्रेसशिवाय देशाला कुठलाही पर्याय राहिला नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपकडून धर्माचा गैरवापर
नाना पटोले म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी ज्या प्रमाणे भाजप धर्माचा गैरवापर करतो, तसे काँग्रेस करणार नाही. आम्ही विचारानेच लढाई जिंकू. नाना पटोले विचारासाठी, जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. नाना पटोलेने राजीनामा सांगून दिला. नाना पटेलेचा इतिहास स्पष्ट आहे. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी विचारा. एक गोष्ट स्पष्ट आहे. लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला की नाही कळला, मला माहिती नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना जगण्याचा अर्थ आहे.

भारताची वाटचाल श्रीलंकेसारखी
नाना पटोले म्हणाले की, देशात अडीच कोटी नोकऱ्या गेल्या. महागाई वाढली. शेतकऱ्यांशी पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. अशी व्यवस्था देशात निर्माण केली गेली. या सर्व गोष्टीची चर्चा व्हायला हवी. आज भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू आहे. तिथे पंतप्रधान आणि इतरांची काय व्यवस्था झाली. याची चिंता भारतीय जनता पक्षाला नाही. माझ्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. हे निश्चित बरोबर नाही. हा खेळखंडोबा थांबवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्य लढ्याला संघाशी जोडू नका
पटोले म्हणाले की, जे लोक मेहबुबा मुफ्तींसोबत होते, असे लोक औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सगळ्या खोट्या गोष्टी सांगून उकरून काढत आहेत. त्या शिवाय या लोकांचे पोट भरत नाही. ज्या हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला, त्या हेडगेवारांचा स्वातंत्र्याचा लढा आणि आता संघाचे विचार यात जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याशी संघाला जोडून बदनाम करू नका. भाजपने हिंदू धर्माचा अपमान केला. सत्तेसाठी भाजपकडून धर्माचे बाजारीकरण सुरू आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची भाजपसोबत युती
राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजप बरोबर हातमिळवणी केली. गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन काँग्रेसला एकटे पाडले. त्यामुळे तेथे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांपासून काँग्रेसला दूर रहावे लागले, याबात पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे तक्रार केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

blank