
चंदीगड,दि.24ः- पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारचे आरोग्य मंत्री डॉक्टर विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंगला यांच्यावर आरोग्य विभागातील प्रत्येक काम व टेंडरच्या मोबदल्यात 1 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे. याची तक्रार खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी गुप्तणे या प्रकरणाची चौकशी केली. अधिकाऱ्यांची विचारपूस करुन सिंगला यांना पाचारण केले. मंत्र्याने चूक मान्य केल्यानंतर त्यांची हकालपट्टी केली.
त्यानंतर काही वेळातच पंजाब पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सिंगला यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. आता त्यांची आम आदमी पार्टीतूनही हकालपट्टी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पंजाबचे आप प्रवक्ते मालविंदर कंग यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिंगला यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सीएम मान यांनी सांगितली संपूर्ण कथा
सीएम भगवंत मान म्हणाले -‘माझ्यापुढे एक प्रकरण आले. त्यात माझ्या सरकारचा एक मंत्री प्रत्येक निविदा किंवा त्या विभागाच्या खरेदी व्यवहारांत एक टक्के कमिशन मागत होता. या प्रकरणाची केवळ मला माहिती आहे. याची विरोधी पक्ष व माध्यमांना कोणतीही माहिती नाही. माझी इच्छा असती तर मी हे प्रकरण दाबून टाकले असते. पण, यामुळे जनतेचा विश्वासघात झाला असता. मी त्या मंत्र्याविरोधात कठोर कारवाई करत आहे. त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत आहे. मी या प्रकरणी पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.’

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्री-आमदारांवर कोणतीच कारवाई केली नाही
मान म्हणाले की, ‘विरोधी पक्ष म्हणतील अवघ्या 2 महिन्यांतच माझ्या सरकारच्या एका मंत्र्याने भ्रष्टाचार केला. पण, अशा मंत्र्यांवर कठोर कारवाई करणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना अवैध वाळू उत्खननात कुणाचा हात होता हे माहिती होते. पण, त्यानंतरही त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. याऊलट मी भ्रष्ट मंत्र्याची हकालपट्टी करण्यासह त्याच्यावर गुन्हाही दाखल करत आहे.’
भ्रष्टांना पक्षात जागा नाही -आप प्रवक्ता
आम आदमी पार्टी पंजाबचे मुख्य प्रवक्ते मालविंदर सिंग कंग यांनी म्हटले आहे की, ‘विजय सिंगला यांनी टेंडरमध्ये 1 टक्क्याचे कमिशन मागितले होते. त्याची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली. पक्षात भ्रष्ट लोकांना कोणतेही स्थान नाही. त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.’