- उद्यमिता यात्रेचे गोंदियात स्वागत
गोंदिया,दि.26 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेली राज्यव्यापी उद्यमिता यात्रा आज गोंदिया येथे पोहचली. जिल्हा परिषद गोंदिया येथे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उद्यमिता यात्रेचे स्वागत केले. या यात्रेमुळे उद्योग निर्मितीला मदत होणार असून शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरणार आहे, असे उदगार अनिल पाटील यांनी काढले.
उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग निर्मितीला मदत होईल असे सांगून आपण जो व्यवसाय करणार आहोत त्याला सद्यस्थितीत मार्केटमध्ये मागणी आहे की नाही याचा विचार करुन आपला उद्योग उभारावा. उद्यमिता यात्रेद्वारे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंरोजगार करुन इतरांसाठी रोजगार निर्मिती करावी असे मत श्री. पाटील यांनी व्यक्त करुन यात्रेस शुभेच्छा दिल्या.
गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यासाठी उद्यमिता यात्रा जिल्हा परिषद गोंदिया येथे पोहचली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात व्यवसाय विकास प्रशिक्षण उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. उद्घाटन समारंभ प्रसंगी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त राजु माटे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक एच.के.बदर, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक व्ही.आर.ठाकुर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य किरण मोटघरे, युवा जागरुकता संचालिका प्रा.डॉ.दिशा गेडाम व माविमचे जिल्हा समन्वयक संजय संगेकर यांची उपस्थिती होती.
उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या अशा विविध योजना जिल्ह्यातील युवक-युवतींपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तेव्हा या उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजु माटे यांनी केले.
यावेळी 140 प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अतुल सतदेवे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार युवा जागरुकता संचालिका प्रा.डॉ.दिशा गेडाम यांनी मानले