जात सांगून मत मागत नाही, सत्तेपेक्षा सेवा महत्वाची : राज्यमंत्री बच्चू कडू

0
26

तिरोडा, दि.5 : आमच्या प्रचाराला नेता नाही. झेंडा नाही, पैसा नाही, जातीचे राजकारण नाही. जात सांगून मत मागत नाही. जो जात पाहून मत मागतो त्याला ठणकावून सांगतो, मत मागू नको. आम्हाला जातीचे मोल पाठवू नको, तर आम्हाला कामाचे मोल पाठव. असे म्हणत म्हणत एकदा नाही तर चार वेळा आमदार झालो. ना नेता, ना पैसा. केवळ कार्यकर्ते आणि तुमच्या सारख्या सामान्य मानसाच्या आशीर्वादावर, तुमच्यासारखा खाली बसणारा बच्चू कडू आज राज्यमंत्री झाला. असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

तिरोडा येथे शनिवार, 4 जून रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन व कामगार रुग्णालयाचे उद्घाटन यानिमित्त त्यांचे तिरोडा येथे आगमन झाले होते. त्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थित झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राज्यमंत्री बच्चू कडू जनसमुदायला संबोधित करताना म्हणाले, पहिली निवडणूक अकराशे मतांनी पडलो. नेमके त्याच दिवशी आमचे आंदोलन होते. सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होते. येथून 20 वर्षाअगोदर नेमक्या आमच्या राजकारणाची सुरुवात झाली. निवडणुकीला उभे राहायचे तर लोक असे म्हणायचे की हे तुमचे काम आहे का? मग कुणी उभे राहायचे. अनेक आंदोलन छेडून सामान्य माणसाला न्याय दिले होते. पहिली निवडणूक लढण्याअगोदर 50-60 गुन्हे दाखल झाले होते. एकही गाव नसेल ज्यात बच्चू कडू फिरला नसेल. असे एकही घर नसणार, अशा पद्धतीने काम केले होते.

बच्चू कडू

निवडणूक आल्यानंतर लोक आम्हाला पाठींबा मागायला आले. आम्ही उभे राहतो, पण पाठींबा तुमचा पाहिजे. त्यावेळी 50 ते 60 कार्यकर्ते आम्ही बसलो. त्यावेळी एक उमेदवार आम्हाला पाठींबा मागायला आला. त्याचवेळी एका लहानशा गावातील कार्यकर्ता उभा झाला आणि म्हणाला, याला पाठींबा देण्यापेक्षा, भाऊ बच्चू कडू तूच का उभा होत नाही. त्यामुळे प्रश्न उभा झाला आणि 50 कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला विधानसभा लढायचे आहे.राजकारणामध्ये सामान्य माणसाला उमेदवार बनावे लागते.

हजारो पेशंटचा जीव वाचवला

आपल्या जीवनातील संघर्षगाथा सांगताना ते म्हणाले, त्यावेळी विधानसभेत कोणती गावे येतात, किती येतात याबाबत आम्हाला काही माहीत नव्हते. तरी कामच करीत होतो. 10 वर्षे काम केले. सात वर्षे विनातिकीट मुंबईला गेलो. दर 15 दिवसांनी विदाउट तिकीट पेशंटला घेवून जायचो. पैसेच नाही राहायचे. कुठून आणणार पैसे? मग पेशंट विदाउट तिकीट, आम्हीही विदाउट तिकीट. पकडले तर भांडायचो. प्रसंग हाणामारीवरही यायचे. अधिक थांबायचे, अधिक निघायचे. सात वर्षे अतिशय कठीण असा प्रवास राहिला. हजारो पेशंटचे जीव वाचवून आणले. पाच-सात वर्षामध्ये 50-60 वेळा रक्तदान केले. एकेक महिना हॉस्पिटलमध्ये राहायचो, तिथेच काम करायचो. आली वेळ तर हॉटेलमध्ये खायचे आणि पेशंटला पैसे लावायचे. असा प्रचंड मेहनतीचा आणि पुण्याचा प्रवास आमचा गेला.प्रत्येक गावातील पेशंट बोलत होता, बच्चू कडूने माझ्यासाठी रक्तदान केले. माझ्यासाठी पैसे जमा केले. माझ्यासाठी भीक मागितली आणि असे करत करत तालुक्याला गवसणी घातली. जाती-धर्माच्या पलीकडे आमचे नाव झाले.

जाती-धर्माच्या आरपार…  

आजकाल नेत्याचे नाव जातीशिवाय, जन्माशिवाय माहीत पडत नाही. झेंडा पाहिजे, झेंड्याला रंग पाहिजे, रंगासोबत जात पाहिजे आणि जातीसोबत धर्म पाहिजे. मंदिर पाहिजे नाहीतर त्यांना मशीद तरी पाहिजे. नाहीतर एखादा पुतळा तरी पाहिजे, त्याच्यावर वाद झाला पाहिजे. मग मतदान होते, अशी आमची लोकशाही. पण बच्चू कडूने या सर्व गोष्टीला आरपार करून सेवा दिली. सेवा पाहिजे म्हणून बच्चू कडू आमदार झाला, तेही चार वेळा.

आमच्या प्रचाराला नेता नाही. झेंडा नाही, पैसा नाही, जातीचे राजकारण नाही. जात सांगून मत मागत नाही. जो जात पाहून मत मागतो त्याला ठणकावून सांगतो, मत मागू नको. आम्हाला जातीचे मोल पाठवू नको, तर आम्हाला कामाचा मोल पाठव. असे म्हणत म्हणत एकदा नाही तर चार वेळा.. ना नेता, ना पैसा. कार्यकर्ते आणि तुमच्या सारख्या सामान्य मानसाच्या आशीर्वादावर, तुमच्यासारखा खाली बसणारा बच्चू कडू आज राज्यमंत्री झाला. आणि चार वेळा निवडून आलो.

आमचा जातीधर्माचा आवाज नाही. शेतकर्‍यांचा, कामगारांचा, कष्टकर्‍यांचा, विधवांचा, पीडितांचा, ज्यांच्यावर अन्याय होत असेल अशा सर्वांचा आवाज म्हणजे ‘प्रहार’चा आवाज आहे, हे लक्षात घ्या. आज जरी मी सरकारमध्ये असलो तरी व्यवस्था जर पाहिली तर अजूनही लोकांचे प्रश्न तसेच आहेत.

डॉक्टरांची समस्या : तिरोड्यातील प्रसूत मातेच्या मृत्यूवर…

येथील एक भगिनी मरण पावली. एमबीबीएस, एमडी डॉक्टर सरकारी रुग्णालयात काम करायला तयार नाहीत. 50 टक्के पोर हे ग्रामीण भागातून एमबीबीएस होतात, एमडी होतात आणि ते ग्रामीण भागात येत नाही. ते म्हणतात आम्ही मुंबईला पाहिजे, पुण्याला पाहिजे. अमेरिकेला जातो, कॅनडाला जातो. डॉक्टर बनून आला म्हणून आम्ही सत्कार करायचे आणि आमच्यावर वेळ आली तर तो मुंबईला, अमेरिकेला पळून जातो. ही माणुसकी आहे? ही संस्कृती आहे? हे आम्हाला जोतिबा फुलेंनी शिकवलं? हे बाबासाहेबांनी शिकवलं? हे छत्रपती शिवाजींनी शिकवलं? अशी प्रश्नांची सरबत्ती करत ते पुढे म्हणाले, अरे महात्मा फुलेंजवळ एवढा अगडबंब पैसा असताना, त्यावेळचा व्यापारी असलेला हा महामानव सामान्य मानसाच्या न्यायासाठी लढा देतो. सावित्रीबाई फुले ह्या सगळं थाटबाट सोडून सामान्य जणांसाठी रस्त्यावर उतरतात. मुलींनी, महिलांनी शिकले पाहिजे, शाळेत गेले पाहिजे म्हणून कष्ट घेतात. आणि लोक त्या मातेला शेण मारतात. आणि शेण मारल्यानंतर महात्मा फुले म्हणतात, कितीदा शेण मारशील. यावर सावित्रीबाई उत्तर देतात, आता हे शेण आहे, उद्या मोती झाल्याशिवाय राहणार नाही.

अश्या या महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये जेव्हा गावातला पोरगा एमबीबीएस होतो आणि तो आमच्या गावखेड्यात येत नाही. आमच्या रुग्णालयात सेवा करीत नाही, याचे दुःख आहे. तुमच्या-आमच्या मायबापाची सेवा करायची मानसिकता राहिली नाही, याचे दुःख आहे. त्याला माहिती आहे की येथे सेवा केली तर पैसा किती मिळेल. सगळा खेळ पैशाचा आहे.सत्ता आणि पैसा याच्याव्यतिरिक्त दूसरा काही संशोधन नाही. राजकीय नेत्याचे, अधिकार्‍याचे, कोणाचे काही संशोधन नाही. सत्ता आणि पैसा याच्याशिवाय आम्ही कुठेच जात नाही. आमचे दुसरे विषय नाही आहेत. दोन वर्षाचा कोरोना येवून गेला, दोन वर्षे तुम्ही-आम्ही सर्व घरात बसले होते. खायला भेटेल, नाही भेटेल, बाप मेला तरी गेला नाही बाहेर, अशी अवस्था आहे.

बच्चू कडू

जातीधर्माच्या दंगली घडविणार्‍यांना लाज वाटावी : बच्चू कडू 

लोक जातीधर्मासाठी दंगली करतात. हजारो लोक मरतात. जातीसाठी दंगली करता आणि बाप मेला तरी बाहेर निघाला नाही. दंगल करता, याची लाच वाटली पाहिजे. जाती आणि धर्मासाठी दंगली करणार्‍यांना माझा सवाल आहे, कोरोनाने जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, भाऊ पाहिला नाही, बाप पाहिला नाही, बायकोला पाहिलं नाही, माय मेली तर जावून पाहिलं नाही आणि तो म्हणतो अब धर्म को बचाना है. इस्लाम खतरे मे है, हिंदू खतरे मे है.

कामगारांच्या प्रश्नावर….  

शेतकर्‍यांची समस्या, महागाई, कामगारांवर बोलताना ते म्हणले, जो कष्ट करतो, काम करतो त्याच्या बाजूने सत्ता नाही. मी कामगार मंत्री आहे. आतापर्यंतच्या कामगार मंत्र्याने 50-60 च्या वर बैठका नाही घेतल्या. मी एका वर्षात 150 बैठका घेतल्या. 75 टक्के बैठकांमध्ये कामगारांना न्याय मिळवून देण्याचा विक्रम बच्चू कडूने केला. एवढ्या ताकदीने आपण काम केले. फॅक्टरीवाल्यांना आपण पहिले, कामगारांचा विषय आला की ते म्हणतात घाटा झाला. त्यांचे केबिन, खुरच्या व कामधाम पहिले तर असे वाटते की करोडोची उलाढाल असेल.

तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. देशासाठी लढणारा सैनिक थांबला तर देश कधी खड्ड्यात जाईल, माहीत पडत नाही. शेतकर्‍याने आपले काम थांबविले, शेती पिकविणे थांबवले तर सर्वांचे पोट उपाशी राहू शकते. आणि कामगाराने काम थांबवले तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ती खुर्ची सुद्धा नशिबी येवू शकत नाही, एवढी ताकद कामगारांमध्ये आहे.25 मजल्याच्या इमारतीवर चढून कामगार काम करतो. वरून खाली पाहिलं तर भोवळ येईल. लावतो बिल्डर पैसा, पण दिलेरी ठेवतो कामगार. पैसा जरी बिल्डर लावत असला तरी जर कामगार त्या 35 मजली इमारतीवर चढला नाही तर काम होवू शकत नाही. इमारत तयार होवू शकत नाही. पण त्याच्या हाती भेटते किती, 200 रुपये, 400 रुपये, 600 रुपये. ही व्यवस्था मला बदलवायची आहे. प्रहार याच्यासाठीच आहे. आज आमची ताकद कमी आहे. मी सरकारमधून निघालो तर सरकार पडू शकत नाही, हे मला माहीत आहे. पण ज्या दिवशी आमच्यामुळे सरकार पडू शकेल, त्या दिवशी शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, हे मला सांगायचे आहे.

शेतकरी आणि धानाच्या समस्येवर…

मंत्री कडू पुढे म्हणाले, आज मोदींचे राज्य आहे. धानाला 50 टक्के नफा धरून भाव देतो. पण त्यांना माहीत आहे, 50 टक्के नफा धरून भाव नाही दिल तरी चालते. त्यांच्यासाठी मंदिर आणि मशिदीचा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही धान उत्पादक शेतकरी मेले तरी चालते. मरून मरून काय करणार आहेत. आम्ही सांगू न तुम्हाला देवाची कृपा होती. अल्ला की मेहरबानी है मर गया. हमे क्या लेनदेन उससे. या देशात 50-60 वर्षांनंतर अजूनही मंदिर-मशिदीसाठी लोक दंगली करतात. मंदिर-मशिदीसाठी वोटिंग करावे लागते. आणि येथे प्रचंड मेहनत करून सामान्य माणूस रोज मरतो. 25 हजार युवकांच्या आतापर्यंतच्या आत्महत्या आहेत. बेरोजगारांच्या आत्महत्या. काम भेटले म्हणून नाही, जगता आले नाही, पैसा नाही खिशात म्हणून मरतात. हे प्रश्न चव्हाट्यावर आलेच नाही. साडे तीन लाख शेतकरी जेव्हा पाय घासूघासू मरतात, तरी आम्ही पाहतो 15 टक्के नफा धरून राज्य सरकारने भाव काढले. 50 टक्के नाही, 15 टक्के. शंभर रुपयाला 15 रुपये. जास्त झाले? कोणता व्यापार करते 15 टक्के मध्ये सांगा. बूट पालीस करणारा सुद्धा 15 टक्केपेक्षा वरचा नफा धरून धंदा करतो.

राज्य सरकारने 15 टक्के नफा धरून भाव शिफारस केली 4 हजार 11 रुपयांची. राज्य सरकार काय म्हणते, धानाला जोपर्यंत 4011 रुपयांचे भाव भेटत नाही तोपर्यंत 15 टक्के नफाही भेटू शकत नाही. राज्य सरकारने 4 हजार 11 रुपये शिफारस केली धानाच्या भावाची आणि केंद्राने फक्त 1940 रुपये धानचे भाव जाहीर केले. त्यामुळे 2079 रूपयांचा तोटा झाला एका क्विंटल मागे. आणि 1940 जो भाव आहे, आणि बाजार पेठेमध्ये आहे 1300 रुपये भाव. म्हणजे 4 हजार आणि 1300 रुपये पकडले तर एका क्विंटलमागे धानावर 2700 रुपये नुकसान झाले, कमी भाव मिळाले.

लुटीचे तंत्र….

पण याचे काही नाही. मंदिर बांधायचे, मशिदी, बांधायचे. सर्व गावांत, घराघरांवर मंदिर बांधा, मशिदी बांधा. तरुणांच्या डोक्यात जात घाला. पण बाप मेला त्याचे आम्हाला काही नाही, त्याचे आम्हाला दुःख नाही. नेता नाही मेला पाहिजे. बाप मरायचे दुःख झाले पाहिजे. नेता जावू द्या. आम्ही मेलो याची काही पर्वा नका करू. पण माझा बाप मेहनत करतो, माझी माय रात्रीचा दिवस करते, त्या मायेच्या हाती येते काय.

आता 2700 रुपये एक क्विंटलमागे, एका एकरामध्ये किती क्विंटल धान होते. 20 क्विंटल पकडले आणि गुणीला 27 पकडले तर एका एकरा मागे 54 हजार आणि दुफसली मध्ये 1 लाख 8 हजाराने लुटले. म्हणजे वर्षाला एका लाखाने लुटायचे आणि 2 हजारचे कर्ज माफ करायचे, अशी ही स्थिती आहे.

एखाद्या गावात आमदार आला आणि 10 लाखांचा निधी दिला तर आम्ही बॅंड वाजवतो. आणि एका गावात एका शेतकर्‍याला 1 लाखाने लुटले तर त्या गावात 200 शेतकरी आहेत तर त्यांना किती लाखाने लुटले. म्हणजे एका गावाला 2 कोटीने लुटले. आणि देते किती एका वर्षात? पाच लाख. 2 करोडने लुटणार्‍याला आम्ही काही म्हणत नाही आणि पाच लाख देणार्‍याचे पाय धरतो. अवस्था कशी आहे. हे खर्‍या अर्थाने लुटीचे तंत्र आहे. वर्षोवर्षी सुरू आहे.

मी मुख्यमंत्र्यांना सांगितले, की केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, पण हरभरा व धान उत्पादक शेतकर्‍याला एका एकरावर किमान 4 हजार रुपये तरी अनुदान द्यावे. ज्यांचा धान खरेदी झाला नाही त्याच्यासाठी. कारण राज्य सरकार खरेदी करू शकला नाही तर अनुदान देवू शकते.

आता राज्य सभेची निवडणूक आहे. आम्ही राज्य सरकारला सांगणार आहोत, शेतकर्‍यांचा हा विषय हाताळा अन्यथा बच्चू कडू निवडणुकीचा विषय ठंडा केल्याशिवाय राहणार नाही. मंत्रिपदाची आम्हाला काही पर्वा नाही. एकतर खरेदी सुरू करायला लावा केंद्र सरकारला आणि केंद्र सरकार सुरू करीत नसेल तर मग आम्ही वेगळ्या पद्धतीने गेल्याशिवय राहणार नाही, असा इशारा सुद्धा राज्यमंत्री कडू यांनी दिला.

अनाथ व अपंग यांच्या आरक्षणाचा शासन निर्णय

तेल, तूर याबाबत केंद्र शासनाचे चुकीचे धोरण असल्याचे सांगून कडू म्हणाले, दोन डोळे, दोन पाय, दोन हात गेलेल्या अपंगांसाठी लक्षवेधी लावून त्यांना लाभ मिळवून दिला. ज्यांचे कुणी नाही अशा अनाथांना आरक्षण देण्याचा शासन निर्णय काढला, 9 अनाथांना लाभ मिळवून दिला. प्रहारच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रचंड काम करायचे आहे. आपण मंदिरात जातो, मशिदीत जातो. जरूर जा, पण आठवड्यातून एकदा दवाखान्यात जावून रूग्णाला मदत करा. सत्ता महत्वाची नाही, सेवा महत्वाची आहे.

एक शाळा दत्तक घ्या…  

गावाने शाळा गावची ओसाड पाडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाच शस्त्र हाती दिले. पण त्या शस्त्राची आम्ही वाट लावली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एक शाळा दत्तक घ्यावे आणि तालुक्यातून सर्वात चांगली शाळा करून दाखवा. त्याद्वारे नवीन क्रांति घडवता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

रयतेचे राज्य आणि प्रजासत्ता

राज्यमंत्री कडू पुढे म्हणाले, येणार्‍या विधानसभेमध्ये आम्ही 15 ते 20 ठिकाणी आमदारकीच्या जागा लढवणार आहोत. कमीत कमी 10 जागा निवडून आणावायच्या आहेत. रयतेचे राज्य झाले पाहिजे. आता हे मोदींचे राज्य आहे. मुघलांचे राज्य होते. औरंगजेबांचे राज्य होते. पण छत्रपतींच्या राज्याला भोसल्यांचे राज्य नाही म्हणत. छत्रपतींच्या राज्याला शिवरायांचे राज्य म्हणत नाही. छत्रपतींच्या राज्याला रयतेचे राज्य म्हटल्या जात होते आणि हे महत्वाचे आहे.

पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणली 26 जानेवारी रोजी. त्या दिवशी गणराज्य दिन मानला जातो. गणराज्य दिन म्हणजे गणाचे राज्य. प्रजेचे राज्य. प्रजासत्ताक. प्रजेची सत्ता. शिवरायाने ही संकल्पना 300 वर्षाअगोदर मांडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तीच संकल्पना उचलली आणि प्रजासत्ता आणली. इकडे रयतेचे राज्य आणि तिकडे प्रजासत्ता. किती मेळ आहे. किती संदर्भ, एकात्म आहे दोघांमध्ये. त्यामुळे महापुरुष एका जातीचा, एका धर्माचा असू शकत नाही. तुम्ही आम्ही त्यांना जातीचे स्वरूप देतो, हा प्रश्न वेगळा आहे.

जिसका पडोसी भुखा नहि सोता…

मोहम्मद पैगंबरने म्हटलं आहे, वो सच्चा मुसलमान है जिसका पडोसी भुखा नाही सोता. आगर पडोसी भुखा सोता है और दस नमाज करता है तो तेरी नमाज अदा होती नही, तू सच्चा मुसलमान नाही. सगळ्या धर्मगुरूंनी असेच म्हटलं.

तुकारामाने त्याच्यासमोर जावून म्हटलं, जे जे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखवा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यात देव पाहणारा आमचा संत आहे. आणि म्हणून मित्रांनो सेवा करा आणि सेवेतूनच अतिशय मजबुतीने सुरुवात करा. बच्चू कडू कामगारांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असे राज्यमंत्री कडू यांनी ठणकावून सांगितले.

सभेचे संचालन प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केले. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने संपर्क प्रमुख रमेश करेमोरे, गोंदिया तालुका प्रमुख राधेश्याम गजभिये, पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने, टिलक पारधी, श्यामरव झरारिया, अर्जुनी-मोरगाव तालुका प्रमुख कार्तिक मानकर, सालेकसा तालुका प्रमुख अभय कुराहे, आमगाव तालुका प्रमुख सुनील गिरडकर, चंदू बडवईक, मिथिलेश दामहे, वामन हजारे, माजी सैनिक तिरोडा तालुका संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

बच्चू कडू

तालुका पत्रकार संघ व अनेकांचा सत्कार

मागील दोन वर्षात आपले सामाजिक दायित्व पार पाडत चांगले कार्य केल्याबद्दल तिरोडा तालुका पत्रकार संघाचा सत्कार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवार, उपाध्यक्ष राधेश्याम नागपुरे, सचिव विजय खोब्रागडे, लक्ष्मीनारायण दुबे, देवानंद शहारे, कमल कापसे, हितेंद्र जांभूळकर, डी.आर. गिरीपुंजे, सचिन ढबाले यांनी स्वीकारला. तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेन्द्र भांडारकर व मुरलीधर गोंडाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याशिवाय कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिल्याबद्दल कवलेवाडा जिल्हा परिषद शाळेची अपंग शिक्षिका मालता भाऊराव रहमतकर, वीट भट्टी कामगार राजेश भेलावे व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांचा मंत्री कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.