भारताच्या चलनावर अर्थात नोटांवर असलेला महात्मा गांधींचा फोटो बदलण्याची चर्चा माध्यमांत सुरू होती. यावर आता रिझर्व्ह बँकेने खुलासा देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जाहीर केले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रसारमाध्यमांच्या काही विभागांमध्ये अशा बातम्या येत आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्याच्या चलनात आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचा चेहरा बदलून इतरांच्या वापरण्याचा विचार सुरू आहे. तथापि, रिझव्र्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी.” रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाळ यांनी यासंदर्भात प्रसिद्धिपत्रक काढले आहे.
RBI clarifies: No change in existing Currency and Banknoteshttps://t.co/OmjaKDEuat
— ReserveBankOfIndia (@RBI) June 6, 2022
याआधी काय होती चर्चा?
रिझर्व्ह बँकेने खुलासा देण्याआधी माध्यमांत चर्चा होती की, भारतीय चलनावर म्हणजेच रुपयावर महात्मा गांधींचा फोटो आहे. पण लवकरच नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर आणि देशाचे 11 वे राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क फोटो काही नोटांवर दिसू शकतात केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नोटांच्या मालिकेवर कलाम आणि टागोर यांचा वॉटरमार्क वापरण्याचा विचार करत असल्याचे वृत्त याआधी आले होते. तसे झाले असते तर नोटांवर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतरांचा फोटो छापण्याची रिझर्व्ह बँकेची पहिलीच वेळ असली असती.
1969 मध्ये छापले पहिल्यांदा बापूंचे छायाचित्र
1969 मध्ये रिझर्व्ह बँकेने 100 रुपयांच्या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधींचा फोटो छापला होता. ते गांधींचे जन्मशताब्दी वर्ष होते आणि आठवण म्हणून नोटेवर बापूंचे छायाचित्र छापले. नोटेवरील चित्राच्या मागे सेवाग्राम आश्रमाचे चित्रही होते. 1987 मध्ये जारी करण्यात आलेल्या नोटांवर पहिल्यांदा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो छापण्यात आला होता. या फोटोसह 500 रुपयांची पहिली नोट ऑक्टोबर 1987 मध्ये आली होती. यानंतर गांधीजींचा हा फोटो इतर नोटांवरही वापरला जाऊ लागला.
सोशल मीडियावर इतरही महापुरुषांचे फोटो छापण्याची मागणी
सोशल मीडियावर भारतातील इतरही महापुरुषांचे फोटो छापण्याची मागणी कायम होत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस, सरदार भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रेही भारतीय चलनावर छापण्याची मागणी सोशल मीडियावर कायम होत असते.