जागतिक महासागरदिनी एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन

0
13

मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचा उपक्रम

“महासागरांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक प्रयत्न”यावर्षीची संकल्पना

 मुंबई, दि. ०७ जून: महासागरांचे महत्त्व आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघांद्वारे दरवर्षी ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राच्या (Center for Excellence in Marine Studies- CEMAS) वतीने एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.                    ” महासागरांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक प्रयत्न” असे या वर्षीचे ब्रीद/ संकल्पना आहे. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते केले जाणार आहे.  डॉ. एस. एस. सी. शेनोई, माजी संचालक, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS), पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MOES), भारत सरकार, हैदराबाद आणि चेअर प्रोफेसर, पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) यांचे या परिसंवादामध्ये विषयास अनुसरून प्रारंभीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर डॉ. बी. मीनाकुमारी, माजी उप. महासंचालक (मत्स्यव्यवसाय), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि माजी अध्यक्ष, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण या परिसंवादात मुख्य व्याख्यान देणार आहेत. परिसंवादाची तांत्रिक सत्रे मत्स्यपालन आणि सागरी परिसंस्था व महासागर आणि हवामान या दोन प्रमुख विषयांवर आधारीत असतील. तसेच त्यानंतरच्या सत्रांत सागरी संशोधन क्षेत्रातील आघाडीच्या संशोधकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली असल्याचे या केंद्राचे संचालक डॉ. फ्रान्सिस पी. ए. यांनी सांगितले.

पृथ्वीचा सुमारे एक तृतीयांश भाग हा महासागरांनी व्यापलेला असून पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचे जीवन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्यांवर अवलंबून आहे तथापि जैवविविधतेने समृद्ध अशा या  सागरी परिसंस्थांचे संतुलन मानवी हस्तक्षेप तसेच नैसर्गिक प्रक्रियांमुळे हळूहळू ढासळत चालले आहे. म्हणूनच आपल्या वसुंधरेचा एक अविभाज्य घटक या नात्याने, मानवी समाज व सर्व प्राणिमात्रांच्या अस्तित्वासाठी तसेच भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी सागरी परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने आपण एकजुटीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. महासागरांचे महत्त्व आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, दरवर्षी ८ जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघांद्वारे जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो.

आपल्या महाराष्ट्र राज्याला ७२० किमी पेक्षा जास्त विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला असल्याने, सागरी विज्ञान या क्षेत्रात उच्च शिक्षण तसेच संशोधनाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. हेच महत्त्व लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने फेब्रुवारी २०२१ मध्ये सेंटर फॉर एक्सलन्स इन मरीन स्टडीज (Centre for Excellence in Marine Studies-CEMAS) ची स्थापना केली. ‘ब्लू इकॉनॉमी’ला बळकटी देणाऱ्या सागरी क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मानवी संसाधने विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून, CEMAS द्वारे या शैक्षणिक वर्षापासून मेरीटाईम क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (M.Sc. in Maritime Studies) हा अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे.  या व्यतिरिक्त   CEMAS केंद्राचाच भाग असलेल्या सिंधू स्वाध्याय संस्था या विभागामार्फत प्राणीशास्त्र (विशेष विषय – समुद्रशास्त्र आणि मस्त्य तंत्रज्ञान) [ M.Sc. Zoology (in specialization with Oceanography and Fishery Technology)] या विषयात पदव्युत्तर पदवी हा अभ्यासक्रम राबवण्यात येतो. याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून सागरी विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc. In Marine Sciences) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.  जागतिक हवामान बदल, सागरी परिसंस्था, सागरी जैव तंत्रज्ञान, सागरी परिसंस्थेला नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे  उद्भवणारे, समुद्राच्या पातळीतील बदल, किनारपट्टीच्या क्षेत्रातील नैसर्गिक घडामोडी आणि सागरी संसाधनांचा संयमीत वापर इ. विषयातील संशोधनातल्या आव्हानात्मक संधी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात करण्याचे योजिले आहे.

परिसंवादाबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया https://cemas.mu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.