कोरोना वाढू शकतो,पुन्हा कठोर निर्णय लागण्यापूर्वी लसीकरण करा – जिल्हाधिकारी

0
23

* ‘हर घर दस्तक’ मोहिमेला आणखी गतिशील करण्याचे निर्देश
* शाळांना मुलांचे डोस पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
* कमी लसीकरण असणाऱ्या ठिकाणी विशेष मोहीम राबविणार

गोंदिया, दि.09: कोरोना’ पासून बचाव करण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण आहे. मुंबई व देशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी पहिला झाला असेल तर दुसरा घ्या. दुसरा झाला असेल तर बूस्टर डोस घ्या. आपल्या घरातील मुलांचे डोस पूर्ण झाल्याची खात्री करा, कोरोनाला सहजतेने न घेता नागरिकांनी लसीकरणाकडे लक्ष वेधण्याचे, आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

             लसीकरण आढावा बैठक, जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे. आजच्या बैठकांमध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच तज्ञांचे यासंदर्भातील निरीक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला टास्क फोर्सच्या सदस्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक या डॉ. अमरीश मोहबे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितिन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. हिम्मत मेश्राम व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

गेल्या काही दिवसात राज्यात व काही जिल्ह्यात रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोबतच कोरोना आता गेला असे गृहीत धरू नये. कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने एक जून पासून ‘हर घर दस्तक’ ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 31 जुलैपर्यंत  ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. बारा वर्षावरील प्रत्येक बालकापासून वयस्क नागरिकांपर्यंत डोस देण्यासाठी घरापर्यंत लसीकरण टीम येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले.

हरघर  दस्तक मोहीम अंतर्गत जिल्ह्यात अधिक ताकदीने सर्वेक्षण आरोग्य तपासणी व समुपदेशन राबविण्यात येणार आहे. कोरोनाची संभाव्य लाटेपासुन सुरक्षित राहण्यासाठी संपुर्ण लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे. ज्या गावांमध्ये लसीकरण करतांना गावकऱ्यांचा विरोध आहे त्या गावांना भेटी देऊन गावातील नागरिकांचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करण्यात यावे. तालुका स्तरावरुन उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष सभा घेऊन लसीकरणाबाबतच्या अडचणी दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोना संदर्भात कुठ्लेही लक्षणे आढ्ळ्ल्यास कोरोना चाचणी करण्याचे व आरोग्य विभागा सोबत सर्व विभाग शिक्षण, महिला व बाल विकास, ग्राम पंचायत, नगर परिषद, पोलीस या सर्वांनी सहयोग देऊन मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

 हरघर दस्तक मोहीम 1 जून 2022 पासून सुरु करण्यात आली ती आता 31 जुलै 2022 पर्यंत राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हरघर दस्तक मोहिमे दरम्यान लसीकरणात 12 ते 14 व 15 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांना प्राधान्याने लसिकरण तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर व साठ वर्षे वा त्यावरील सह व्याधी असलेले नागरिक यांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावे. असे आवाहन डॉ. नितीन वानखेडे यांनी केले.
लसीकरणाची गती कमी असलेल्या ठिकाणी अधिक गतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी तसेच गावांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांनी, युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले.

लक्षणे दिसली की चाचणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळून आल्यास कोणत्याही रुग्णाला आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये सक्तीने भरती करण्यात आलेले नाही. घरी विलगीकरणात रुग्णांना राहता येणार आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आले तरी घाबरू नये, मात्र लसीकरणापासून वंचित राहू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले अथवा नाही याबाबत शाळांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. तसेच विद्यार्थ्यांचे पूर्ण लसीकरण होईल याची खातरजमा करावी. शाळा सुरू झाल्यानंतर या बाबतची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी झालेल्या लसीकरण विषयावरील बैठकीमध्ये कोरोना व्यतिरिक्त वर्षभरात आवश्यक असणाऱ्या लहान मुलांपासून वयस्कापर्यंतच्या अनिवार्य व आवश्यक (कोरोना व्यतिरिक्त) लसीकरणाची गती वाढवावी व नियमितपणे सर्वांना सर्व लसी उपलब्ध राहतील याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.