धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून तत्काळ चुकारे द्या – आमदार विजय रहांगडाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
109

मुंबई | तिरोडा-गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजय रहांगडाले यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील रबी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची व शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तात्काळ देण्याची मागणी केली.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रबी हंगामात धान उत्पादन होते. मात्र, शासनाकडून धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित ठेवले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करूनही हमीभावाने धान विक्री करण्यास अपयश येते. परिणामी, त्यांना दलालांच्या माध्यमातून कमी दराने धान विकावे लागते. या पार्श्वभूमीवर धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवणे ही काळाची गरज असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी स्पष्ट केले.

तसेच मागील हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे अद्याप देय आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे थकीत चुकारे त्वरित दिले जावेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन या भेटीत देण्यात आले.