रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा- खासदार अशोक नेते

0
44

संसद रस्ता सुरक्षा समिती बैठक

वेगावर नियंत्रण ठेवा

गोंदिया, दि 14: विविध कारणांमुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना खासदार व समिती अध्यक्ष अशोक नेते यांनी दिल्या.बैठकीत आमगाव-कामठा मार्गाचे बांधकाम करण्यासोबतच आमगाव गोंदिया मार्गावर सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा आढावा घेत काम गतीने करुन सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

संसद रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार सुनील मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, कार्यकारी अभियंता एन. टी लभाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे व अधिकारी ,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, गजेंद्र फुंडे,जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे,घनश्याम अग्रवाल,यशवंत मानकर,संजय कुलकर्णी, शंभूदयाल अग्रिका,प्रमोद कटकवार,नरेन्द्र बाजपाई,नविन जैन आदी पदाधिकारी सुध्दा उपस्थित होते.

जिल्ह्यातील रस्त्यावर असणाऱ्या ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. सध्या जिल्ह्यात आठ ब्लॅक स्पॉट आहेत. जिल्ह्यातील रस्त्यावर असणाऱ्या स्पीड ब्रेकरचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. प्रत्येक रस्त्यावर ट्राफिक साईन असल्याची खात्री करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. 108 अम्ब्युलन्स सेवेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

मागील चार वर्षात जिल्ह्यात अपघातात मृत्यू झाल्याच्या संख्येत घट झाली आहे. 2018 मध्ये 174 अपघात, 2019 मध्ये 160, 2020 मध्ये 140 व 2021 मध्ये 132 मृत्यू अपघातात झालेत. गेल्या चार वर्षात ही संख्या घटली आहे.

जिल्ह्यात रस्ता सुरक्षा संबंधी कामकाजावर लक्ष ठेवणे, रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची आकडेवारी ठेवणे, रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या कारणांचे अध्ययन व उपाययोजना करणे, अपघात प्रवण स्थळांची निश्चिती करणे व त्यांच्यात सुधारणा करणे, रस्ते सुरक्षा विषयक मानकांची निश्चिती करणे आदी सुरक्षा समितीची कार्ये आहेत.

रस्ते अपघात आढावा, ब्लॅक स्पॉट आढावा व उपाययोजना, अपघाताचे विश्लेषण करण्यासाठी आयआरएडी ॲपचा वापर, जीवणदूत योजना, रुग्णवाहिका 108 आढावा, रस्त्यावर दिशादर्शक, माहितीदर्शक फलक लावणे व रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्यास बक्षिस

रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्यास आपल्याला पोलीस त्रास देतील असा नागरिकांचा समज आहे. असे अजिबात नसून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. मदत करणाऱ्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये असे न्यायालयाचे निर्देश आहेत. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीला आता जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख बक्षिस देण्यात येणार आहे.