
जि.प शाळेत कृषिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया,दि.०१- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न हिराटोला येथील मनोहरभाई कृषी महाविद्यालयाच्या वतीने आज मंगऴवारी (दि.०१) कृषी दिनाचे औचित्य साधून आमगाव तालुक्यातील बाम्हणीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस सी अवताडे, कार्यक्रम समन्वयक मिथून भगत कार्यक्रम अधिकारी कमलेश चव्हाण सहप्रमुख सयोग उराडे यांचे मार्गदर्शनाखाली कृषिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजोरा केंद्राचे केंद्रप्रमुख व्ही.एस. कुंभलवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे राजेंद्र फुन्ने, शिक्षक एम टी जैतवार, पी.यु गौतम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोहरभाई पटेल कृषिमहाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी भदाडे, तेजस्विनी बिसेन, सुहानी भुसारी, विशाखा आंबेडारे, वैदवी भरणे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना शेतीविषयक माहिती, पर्यावरणाचे महत्व, जैविक तंत्रज्ञान, शेतीचे आधुनिक प्रकार आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना श्री.कुंभलवार यांनी पर्यावरणाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय परिसरात वृक्षारोपण करून विविध प्रजातीच्या रोपटे लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन तेजस्विनी बिसेन यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सृष्टी भदाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावातील शेतकरी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.