तुमसर- बंद झालेले शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी १६ जून रोजी तुमसर-बपेरा राज्यमार्गावरील सिहोरा टी-पॉईंटवर शेतकर्यांनी रस्त्यावर धान टाकून रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात बैलबंडीसह शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते.
सदर आंदोलन सर्वपक्षीय होते. यावेळी आंदोलनाचे आयोजनकर्ते माजी सभापती कलाम शेख यांच्यासह माजी आमदार चरण वाघमारे,किसान गर्जना चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भाऊ पटले. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले, पं. स. सभापती नंदू रहांगडाले, उपसभापती हिरालाल नागपूरे, किसान आघाडीचे हरेंद्र रहांगडाले, पं. स. सदस्य सुभाष बोरकर, माजी सरपंच छगन पारधी, बंटी बानेवार, सरपंच गडीराम बांडेबुचे, सरपंच गजानन लांजेवार, सतीश चौधरी, सरपंच बन्सी नागपूरे, डॉ. अशोक पटले, सरपंच सहादेव ढबाले, हेमराज लांजे, राजेश पटले, सरपंच उमेश्वर कटरे, देवानंद लांजे, अजय खंगार, विनोद मोरे, माणिक ठाकरे, मिलिंद हिवरकर, पिंटू हुळ आदी उपस्थित होते.
सदर आंदोलन सकाळी ११ वाजतापासून सुरू करण्यात आले. दोन तासांचा अवधी लोटूनही आंदोलनस्थळावर कोणतेही जबाबदार अधिकारी व प्रतिनिधी हजर झाले नाही. जिल्हा पणन अधिकार्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून एका कर्मचार्याला पाठविले. परंतु, आंदोलनकर्त्यांनी त्या प्रतिनिधी बरोबर चर्चा न करता आल्यापावली परत पाठविले. जोपर्यंत जिल्ह्यातील जबाबदार प्रतिनिधी म्हणून खासदार, आमदार व जिल्हा पणन अधिकारी आंदोलनस्थळी येणार नाही, तोपर्यंत आंदोलनस्थळावरून हलणार नाही, अशी टोकाची भूमिका शेतकर्यांनी घेतली. तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनीसुद्धा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही यश आले नाही. आंदोलनास्थळी एकही जबाबदार अधिकारी किंवा प्रतिनिधी चर्चेसाठी येत नसल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आणि आंदोलन पुन्हा चिघळले. सर्व शेतकरी बैलबंडी घेऊन पुन्हा रस्त्यावर आले. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलिस प्रशासनाने हाणून पाडला. जोपर्यंत बंद असलेले धान खरेदी केंद्र व वेबसाईट सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली होती.
अखेर पणन अधिकार्यांनी दिली भेट
आधारभूत धान खरेदी पूर्ववत सुरू करुन शेतकर्यांचे संपूर्ण धान खरेदी करावे, या मागणीसाठी सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेले आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरूच होते. जबाबदार अधिकारी आणि पदाधिकारी आंदोलनस्थळी येण्यास टाळाटाळ करीत असल्याने आंदोलनकर्त्यांचा संयम हळूहळू संपत होता. अखेरीस कुणीही येत नसल्याने पाहून आंदोलक संतापले आणि पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात आले. काही वेळेनंतर जिल्हा पणन अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. परंतु, धान खरेदी प्रकरण हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील बाब असल्याचे सांगत यावर मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. जर वरिष्ठांकडून आदेश आल्यास मी त्यांचे पालन करीन, असे सांगितले. आंदोलनादरम्यान वाहतूक प्रभावित झाली होती.