भंडारा -न्यायालयात जुन्या भांडणातून एकाने चाकू घेऊन दुसर्यास मारण्यास धावला. तो थेट न्यायाधीशांकडे पळाल्याने तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. हा थरार बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भंडारा सीजीएम कोर्टात घडला.
साद जाहिदजमा कुरेशी (२0) रा. अंबिका नगर भंडारा असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याचे साथीदार फरार आहेत. शुभम नरेंद्र रामटेके (२१) रा. आंबेडकर नगर, भंडारा व साद कुरेशी यांच्यात जुने भांडण आहे. शुभम रामटेकेविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या प्रकरणाची पेशी २८ सप्टेंबर रोजी भंडारा न्यायालयात होती. त्यामुळे शुभम, रितीक वासनिक, साहिल बांबोर्डे रा.आंबेडकर वॉर्ड भंडारा हे तिघे सकाळी ११ वाजता न्यायालयात पेशीसाठी आले होते. दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास आरोपी साद कुरेशी हा आपल्या अन्य तीन साथीदारांसह न्यायालयाच्या आवारात हातात चाकू घेऊन आला. हातातील चाकू घेऊन तो शुभमच्या मागे धावू लागला. या प्रकारामुळे शुभम घाबरला आणि न्यायाधीशांच्या कोर्टात ओरडत पळाला. त्यावेळी न्यायालयाच्या वर्हांड्यातून आरोपी साद हा शुभमला उद्देशून ‘तुने मेरे को चाकु से मारा था, तु मेरे को बाहर मिल, तेरे को मारना है’ असे म्हणाला. शुभमने हा प्रकार न्यायाधीशांना सांगितल्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलविण्यात आले. त्यानंतर न्यायालयात कर्तव्यावर असलेले पोलिस येताच त्यांना पाहून चारही आरोपी पळू लागले. पोलिसांनी न्यायालयाच्या पार्किंगमध्ये आरोपी साद जाहीदजमा कुरेशी याला पकडले. त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. तर अन्य तीन मुले पळून गेले.
याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू करीत आहेत.