33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News महाराष्ट्रातील ४ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार

महाराष्ट्रातील ४ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार

0
28

blank

(महान्युज) नवी दिल्ली : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्‍या महाराष्ट्रातील प्रिती पाटकर, ज्योती म्हापसेकर, सिस्टर लुसी कुरीयन आणि शकुंतला मुजुमदार या महिलांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल मध्ये वर्ष २०१५ च्या नारी शक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, सचिव व्ही. सोमसुंदरम यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातील १५ महिला व ५ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील चार महिलांचा यात समावेश आहे.

पुरस्कार प्राप्त प्रिती पाटकर या सामाजिक व मानवी हक्क कार्यकर्त्या असून त्या प्रेरणा संस्थेच्या सह संस्थापक आहेत. वेश्याव्यवसायात काम करणाऱ्‍या महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील वेश्या वस्तींमधे गेल्या २८ वर्षांपासून त्या कार्य करीत आहेत. फसवणूक करून आणल्या जाणाऱ्‍या निष्पाप मुलींची सुटका करण्याचे उल्लेखनीय काम श्रीमती पाटकर यांनी केले आहे.  प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ५ हजार पोलीस अधिकाऱ्‍यांना आणि ३०० सामाजिक संस्थांना प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सन २०१० मध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

ज्योती म्हापसेकर या पर्यावरण रक्षक कार्यकर्त्या आहेत. १९७५ पासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या ‘स्त्रीमुक्ती संघटनेच्या’ सह संस्थापक आहेत. मुंबई व परिसरातील शहरांमधील कचरा वेचणाऱ्‍या कामगारांसाठी त्यांनी ‘नाविण्यपूर्ण व्यवसाय प्रारूप’ तयार करून त्याची प्रभावी अमंलबजावणी केली. ५० हजार कामगारांना त्याचा लाभ झाला. या संस्थेने कचरा वेचणाऱ्‍या कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबांतील मुलींसाठी आरोग्य व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
सिस्टर ल्युक कुरियन या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या असून गेल्या १८ वर्षांपासून महिला व बालकल्याणासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. माहेर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणाचे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले आहे. माहेर संस्थेने निराधार महिलांना निवारा व पूर्ण सहाय्य केले आहे. २ हजार ६९१ महिलांना त्यांनी निवारा दिला. २ हजार ३३९ महिलांचे पुनर्वसन केले. ५९ महिलांची बाल विवाहापासून सुटका करून त्यांना आधार दिला. संस्थेने महाराष्ट्र आणि झारखंडमधे एकूण ५२३ बचतगट स्थापन केले आहेत.

पुरस्कार प्राप्त शकुंतला मुजुमदार या प्राणी मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ मुक्या प्राण्यांची सेवा केली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या संयोजक म्हणून कार्यरत असून त्या ठाणे स्थित प्राणी कल्याण मंडळाच्या संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष आहेत. दक्ष व समर्पित डॉक्टरर्स व कर्मचाऱ्‍यांच्या मदतीने अपघात झालेल्या व आजाराने ग्रस्त प्राण्यांवर या रूग्णालयात उपचार करण्यात येतात.

blank