महिला ह्याच खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा- सुधीर मुनगंटीवार

0
7
मुंबई : जागतिक मंदीच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेला फारशी झळ बसली नाही. याचे कारण जगात सर्वाधिक २७ टक्के बचत ही भारतीय नागरिकांकडून केली जाते. त्यातही भारतीय महिलांकडे बऱ्याच प्रमाणात घराचे-कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन आहे आणि महिला या जगातील उत्तम व्यवस्थापक आहेत. महिलांमध्ये कर्ज परतफेडीचे प्रमाण जवळपास 100 टक्के असते. कर्ज परतफेडीबाबत त्या खूप संवेदनशील असतात. त्यामुळे महिला ह्याच खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहातात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, महिला आणि बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाच्या आयुक्त विनिता सिंघल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सीआयआयचे सीईओ आर. नरोत्तम रेड्डी, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

महिलेच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी करणार
माझ्याकडे असलेल्या महिला आणि ग्रामविकास विभागासह जलसंधारण, मनरेगा या विभागांच्या योजना आखतानाही त्यात महिलांना केद्रस्थानी ठेवून नियोजन केले जाते. जलयुक्त शिवार अभियानातही शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवणे व त्यांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी करणे, हाच उद्देश ठेवण्यात आला आहे, असेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
शहरी आणि शिक्षीत भागापेक्षा आदिवासी भागात मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलींची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये बीडचा समावेश झाला त्यावेळी खूप व्यथित झाले होते. त्यामुळेच आपण आमदार असतानाच्या काळात ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ अभियान राबविले. महिला आणि बालविकास मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर या संकल्पनेस व्यापक स्वरुप देऊन ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची आखणी करण्यात आली. ही योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
केसरकर म्हणाले, महिलांमध्ये उद्यमशीलता दडलेली असते. त्याला चालना दिल्यास महिला आपल्या कुटुंबासह देशाच्या आर्थिक विकासात योगदान देऊ शकतात. राज्यात बचतगटाची चळवळ गतिमान झाली आहे. पण या बचतगटांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन उत्पादनांची निर्मिती करणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये दुग्धक्रांती यशस्वी झाली. त्याच धर्तीवर घराघरात छोटे-मोठे उद्योग निर्माण करुन महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देणे गरजेचे आहे.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या, बालिका भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुलींना शिक्षीत करणे, त्यांचे पोषण करणे आणि त्यांना सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरु करण्यात आली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी यापुढील काळातही विविध योजना आखण्यात येतील.