सिंचन प्रकल्पांसाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळाची स्थापना- मुख्यमंत्री

0
8

मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील आंतरराज्य सिंचन प्रकल्पाबाबतचे सर्व निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवनिर्मित तेलंगणा राज्याने यापूर्वी केलेले सर्व करार स्वीकारणे तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या अन्य आंतरराज्य सिंचन प्रकल्पांबाबतचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिंचन प्रकल्पासंदर्भात उभय राज्यांत करार करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, तेलंगणाचे जलसंपदा मंत्री हरीश राव, तेलंगणाचे वन मंत्री जे.रामन्ना, तेलंगणाचे गृहनिर्माण, कायदा व निधी मंत्री ए.इंद्रकरण रेड्डी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, तेलंगणाचे मुख्य सचिव डॉ.राजीव शर्मा, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, लाभक्षेत्र विकास सचिव शिवाजी उपासे तसेच दोनही राज्याच्या जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शेजारी राज्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केल्यास आणि मिळून कामे केल्यास दोन्ही राज्यांचा विकास होतो. त्यामुळे कुठलाही विवाद न करता दोन्ही राज्यातील प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या सिंचन प्रकल्प मंडळाच्या स्थापनेने दोन्ही राज्यातील शेतकरी समृद्ध होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.