
नागपूर- येथील हिवाळी अधिवेशन सध्या चांगलेच गाजत आहे. अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना आज निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन झाले आहे. यावेळी विरोधापक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
दिशा सालियन प्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. दिशा प्रकरणावरुन शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. त्यावर विरोधी पक्ष नेते आजित पवार यांनी आक्षेप घेत आपली बाजू मांडताना या प्रकरणामध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आल्याचा उल्लेख केला. मात्र यानंतर फडणवीसांनी पुन्हा स्पष्टीकरण देताना अजित पवारांचा मुद्दा खोडून काढला. दिशा सालियन प्रकरणामुळे आजी आणि माजी उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळालं.
काय आहे प्रकरण?
पूजा चव्हाणचा उल्लेख करत म्हणाले, “…तर मग सगळ्याच चौकशा झाल्या पाहिजे”
“ही चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षाने आज आमची खूप महत्त्वाची कामं, विषय आहेत. त्यासंदर्भात कुणी काढलं तर मग पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातही चौकशी करा,” असं आजित पवार म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर, “जसे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसा मी होतो. आम्हाला पण काही थोडा अधिकार होता. आम्ही पण सांगत होतो की याची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळेस हेच मान्यवर विरोधी पक्षामध्ये होते. त्या त्यावेळी कशापद्धतीने सभागृह बंद पाडण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा कार्यक्रम झाला हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं,” असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना पूजा चव्हाण प्रकरणाची आठवण करुन दिली. “चौकशा करायच्या असल्या तर सगळ्यांच्याच चौकशा कराव्या लागतील. चौकशी बंद झाली असली तरी रिओपन करता येते,” असं म्हणत अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. अजित पवार यांनीही बोलू देण्याची मागणी केली, पण नार्वेकर यांनी नकार दिला.
आज हिवाळी अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते व भाजप, शिंदे गटाचे नेते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमनेसामने आले. नागपूर भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. तर, अभिनेता सुशांतसिह राजपूत तसेच दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकातर्फे (SIT) चौकशी केली जाईल, अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
- दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधानसभेत भरत गोगावले आणि नीतेश राणे यांनी उपस्थित केले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली. दिशा सालियानचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर न येणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, अशी मागणी गोगावले आणि नीतेश राणे यांनी केली. दिशा सालियानाचा मृत्यू झाला त्या रात्री तिथे कोणता मंत्री उपस्थित होता, असा सवाल करत नीतेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. याप्रकरणावरून भाजप व शिंदे गटाने विधानसभेत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
- देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी मान्य करत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी लवकरच विशेष तपास पथक स्थापले जाईल. SITमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा करताच मविआ नेत्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचीही चौकशी करा, अशी मागणी केली.
फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधकांचा सभात्याग
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून आज विधानसभेत महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास रद्द करत केवळ या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तसेच ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनीही फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली.
- त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सभात्याग केला. यानंतर पत्रकार परिषदेत मविआ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना रश्मी शुक्ला या पुणे पोलिस आयुक्तपदी होत्या. तेव्हाच त्यांनी विरोधी नेत्यांसह स्वपक्षातील नेते तसेच पत्रकारांचेही फोन टॅप केले. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवरून रश्मी शुक्लांनी हे फोन टॅप केले का? हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आज आम्ही विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.
मविआ काळात रश्मी शुक्ला दोषी
- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रश्मी शुक्ला यांनी कुणाच्या आदेशावरून फोन टॅप केले, हे समोर येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. चौकशीत रश्मी शुक्ला दोषी आढळल्या होत्या. मात्र, राज्यात सत्तांतर होताच आताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्लांना क्लिन चिट दिली व या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. यावरून न्यायालयानेही शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले. चौकशी केल्याशिवाय क्लोजर रिपोर्ट कसा काय दाखल करू शकता?, असा सवाल न्यायालयाने केला आहे. याच मुद्द्यावर आम्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती, असे अजित पवार म्हणाले.
- ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा द्या’, ‘राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा’, अशी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. विशेष म्हणजे यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात श्रीखंडाचे डबे होते. यावर ‘भूखंडाचा श्रीखंड’, असे लिहिले आहे. ‘भूखंडखाऊ मुख्यमंत्री, राजीनामा द्या’, असे फलक हातात घेऊन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केली.
- तसेच, महारापुरुषांबाबत सातत्याने अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही राज्य सरकारने तातडीने पदावरून दूर करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.
- महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गट व भाजप आमदारांनीही विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. ‘अभिनेत्री रिया चक्रवर्तीला AUचे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे’, अशी मागणी काल लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यावरूनच या AUचे सत्य समोर आले पाहीजे, अशी घोषणाबाजी शिंदे गट व भाजपच्या आमदारांनी केली.
अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवा
- अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवून 2500 रुपये प्रतिमहीना करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे. तसेच, राज्य सरकार याबद्दल नक्की विचार करेल, अशी आशाही रोहीत पवार यांनी व्यक्त केली. सध्या अंगणवाडी सेविकांना प्रतिमहीना 1225 रुपये वेतन दिले जाते. हे वेतन अत्यंत तुटपुंजे असल्याचे रोहीत पवार म्हणाले.