बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विकासकामांसाठी १९.७५ कोटींचा निधी मंजूर

0
9

चंद्रपूर, दि.२२ : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने  बल्लारपूर विधानसभा मतदार संघात १९ कोटी ७५ लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली.

सन २०२२-२३ च्या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर विकासकामांमध्ये प्रामुख्याने पेटगांव-भादुर्णी-मारोडा-मुल-चिचाळा-भेजगांव-बेंबाळ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १० कोटींचा निधी, पोंभुर्णा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील जुनगांव गावाजवळ प्रस्तावित मोठ्या पुलाच्या पोचमार्गाकरिता भुसंपादन व सेवावाहीनी स्थलांतरीत करणे या कामासाठी ३ कोटी रु. निधी,  कोळसा-झरी-पिंपळखुट-अजयपूर-केळझर-चिरोली-चिचाळा-ताडाळा-बोरचांदली रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ७५ लाखांचा निधी, आक्सापूर-चिंतलधाबा (प्रजिमा २४) रस्त्याच्या रूंदीकरणासह मजबुतीकरण, डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे या कामासाठी ३ कोटींचा निधी असा एकूण १९ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नुकताच केंद्रीय मार्ग निधीतून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा तालुक्यातील दोन उंच पुलाच्या बांधकामासाठी ११० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते व पूल बांधकामासाठी सातत्याने मंजूर होणाऱ्या निधीअंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.