
नववर्ष स्वागत कार्यक्रम
आरोग्य व रक्तदान शिबीर आयोजित
अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप
महसूल विभागाचा उपक्रम
गोंदिया दि.2 : शासन ही लोककल्याणकारी संस्था असून प्रशासकीय अधिकारी हा लोकसेवक आहे. आपली भूमिका ही लोकांच्या हिताची व कल्याणाची असावी. आपल्याकडे येणाऱ्या नागरिकांना वेळेत सेवा पुरविणे आपले कर्तव्य आहे. नव्हे ते आपले सामाजिक दायित्वच आहे. शासकीय सेवा प्रदान करतांना कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववर्ष स्वागत, आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा सूचना अधिकारी गजभिये, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी करणकुमार चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप, कोविड मध्ये ज्यांचे पती मृत्यू पावले अशा महिलांना अन्न धान्य किट वाटप, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल संबंधी पुस्तक वाटप, नियोजन विभाग यांना आस्थापना व माहिती अधिकार पुस्तक वाटप व पुरवठा विभाग यांना आस्थापना बाबत पुस्तक वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवं वर्षाचे अशा अभिनव पद्धतीने व लोकोपयोगी उपक्रमाने स्वागत करण्यात आले. अधिकारी कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी, वृक्षारोपण व पोस्टामार्फत विमा सुरक्षा पॉलिसी असा हा उपक्रम जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्हा यांनी आयोजित केला होता.
आरोग्य तपासणी, पुस्तक वाटप व विमा सुरक्षा कवच या अभिनव उपक्रमाने नवीन वर्षाचे स्वागत ही संकल्पना प्रशंसनीय असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व आर्थिक सुरक्षेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. शासनात काम करतांना सातत्याने नव्या बदलांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता नियम, कायदे, शासन निर्णय यांचा अभ्यास करावा. त्याआधारे सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा. प्रत्येकाने आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून लोकसेवा केल्यास लोककल्याणकारी शासन प्रशासन हा संदेश लोकांपर्यंत पोहचेल व शासनाची प्रतिमा उंचावेल असे ते म्हणाले.
सामान्य नागरिकांचे आपल्याकडे असलेले काम वेळेत पूर्ण करणे म्हणजेच सुशासन असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील म्हणाले की, आपण लोकसेवक आहोत लोकांना विहित वेळेत सेवा देणे आपले कर्तव्य आहे. शासकीय कामकाजासाठी आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांना प्रतिसाद द्या व त्यांनी कामे प्राधान्याने करा असा सल्ला त्यांनी दिला. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने लोकांची कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प करा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. दप्तरमुक्त शाळा व एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या कामाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना द्या तसेच त्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घ्या असे त्यांनी सांगितले.
शालेय साहित्य वाटप, आरोग्य तपासणी व विमा कवच या उपक्रमात अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेकांनी आरोग्य तपासणी केली व पोस्टची ३९९ रुपयांची विमा पॉलिसी सुद्धा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चोबे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष शेंडे यांनी मानले. या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





