37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक, गोवंशीय पशुधन बाजार व बैलगाडी शर्यतीस मंजुरी

जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक, गोवंशीय पशुधन बाजार व बैलगाडी शर्यतीस मंजुरी

0
31

blank

शासनाच्या नियमांचे व अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

          गोंदिया,दि.11 : लम्पी आजारामुळे बंदी घालण्यात आलेल्या गोवंशीय पशुधन बाजार, जिल्ह्यांतर्गत पशुधन वाहतुक व बैलगाडी शर्यतीस जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे. गोवंशीय पशुधन बाजार भरविणे, शर्यती आयोजित करणे, तसेच जिल्हयांतर्गत गुरांच्या वाहतूकीस मान्यता देण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केली आहे. गोवंशीय पशुधन बाजार व बैलगाडी शर्यतीस मान्यता देतांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व अटी शर्तीची पूर्तता करणे बंधनकारक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अटी व शर्ती

       केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हयांतर्गत गुरांची वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्म रोगाकरीता 28 दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग बिल्ला नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक असेल. संक्रमीत, संक्रमीत नसलेल्या क्षेत्रातुन गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्रधिकृत करण्यात आले आहे.

           गुरांची वाहतूक करतांना प्रपत्रातील आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम अन्वये स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. उपरोक्त प्रमाणे निर्बंध शिथिल केल्यामुळे जिल्हयात गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची बाब निर्दशनास आल्यास आढावा घेऊन रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ निर्बंधाची काटेकोरपणे पुन्हा अंमलबजावणी करण्यात येईल.

          हजार मीटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसेल अशा योग्य धावपटटीवर बैलगाडी शर्यती करता येईल. बैलगाडी शर्यतीची धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खडक असलेली, चिखल, दलदल असलेली, पानथळीची किंवा पातळ चिखल असलेले ठिकाण नसावे. बैलगाडी शर्यत रस्त्यावर किंवा महामार्गावर आयोजित करण्यात येऊ नये. बैलांना किंवा वळूंना एखाद्या विशिष्ट शर्यतीसाठी किमान 30 मिनिटे आराम द्यावा आणि कोणत्याही वळूचा किंवा बैलांचा वापर एका दिवसामध्ये 3 पेक्षा अधिक शर्यतीसाठी करण्यात येऊ नये. धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान 20 मिनिटे आराम द्यावा. केवळ एका गाडी वाहकास बैलगाडी चालवण्यास परवानगी असेल आणि अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बैलगाडी भोवती चालविता येणार नाही.

           कोणत्याही गाडी, वाहन किंवा बैलांच्या शर्यतीचा प्रस्ताव देणारी व्यक्ती तिच्या कडे किंवा गाडीवर कोणतीही काठी, चाबूक, पिंजरी इत्यादी किंवा बैलास दुखापत करु शकेल किंवा विजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतेही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही. पाय बांधणे किंवा बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक अथवा पिंजरी यासारखे कोणतेही साधन अथवा विद्युत धक्का किंवा अन्य साधनाचा वापर अथवा जननअंग पिळणे अथवा जननअंगावर लाथ मारणे अथवा आरुने जनन अंगास इजा पोहचवणे अथवा शेपूट पिरघळणे अथवा शेपटीस चावा घेणे यास गाडी वाहकास प्रतिबंध असेल.

          आयोजकांनी उत्सवामध्ये नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायीकाची सेवा किंवा पशुरुग्न वाहिकेची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याकरीता वापरण्यात येणा-या प्राण्याला कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याचा प्रभार असणा-या व्यक्तीकडून बैलगाडी शर्यती पूर्वी किंवा दरमान्य कोणत्याही साधनाव्दारे कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही याची खात्री करावी. आयोजकांनी बैलांना किंवा वळूंना शर्यती अगोदर किंवा त्या दरम्यान कोणतेही उत्तेजक औषधीद्रव्य, अल्कोहोल, मादकद्रव्ये इत्यादी दिली जात नसल्याची खात्री करावी. शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असणा-या कोणत्याही गाडी वाहकास अल्कोहोल किंवा मादक द्रव्य वापरण्यास किंवा बाळगण्यास मनाई असेल. वरील अधिसुचनेतील संपुर्ण अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

blank