अर्जुनी-मोर.-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन विचारांची प्रेरणा देणारी क्रांतीज्योत यात्रा आज नवेगाव बांध येथे किशोर तरोणे यांच्या निवासस्थानी पोहोचली. यावेळी क्रांतीज्योतीचे विधिवत पूजन व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला भक्तिमय व प्रेरणादायी वातावरण लाभले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय प्रचार सर्वाधिकारी गोपालदादा कडू, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामदास देशमुख, राजेंद्र गाडगे, मध्यवर्ती प्रतिनिधी बाबाराव दोहत्रे, नागपूर जिल्हा सेवा अधिकारी अवीदादा राऊत, गोंदिया जिल्हा महिला सेवाधिकारी सौ. मुक्ताताई हत्तीमारे, मोहन सपाटे, वेदांतदादा पांडे व दिगंबरदादा पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला लोकपाल गहाणे, शैलेश जयस्वाल, यशवंत गणवीर, चंद्रकलाताई ठवरे, भोजराम रहिले, अण्णाजी डोंगरवार, महादेव बोरकर, पांडुरंग भोपे, मनोहर तरोणे, इंद्रदास झिलपे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला राष्ट्रभक्ती, ग्रामविकास, स्वच्छता, सामाजिक एकोपा, मानवता आणि जनजागृतीचा संदेश दिला. त्याच विचारांची ज्योत प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या क्रांतीज्योत यात्रेतून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन हरिभक्त परायण शुभमदादा तरोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार किशोर तरोणे यांनी मानले. क्रांतीज्योतीच्या आगमनामुळे नवेगाव बांध परिसरात राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर निर्माण झाला असून, “ज्योत तेवत राहो, विचार जागत राहो आणि राष्ट्रसंतांचा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचत राहो,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





